
<<< साधना गोरे >>>
बालवर्गात मुलांना केसापासून नखापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या अवयवांची नावे शिकवली जातात. अगदी बोटांची नावेही शिकवली जातात, पण गुडघ्याच्या मागच्या बाजूला जो बाक असतो त्याला काय म्हणतात हे शाळेत सांगितले जाते की नाही माहीत नाही. म्हणून मग गुगलला विचारलं. मराठीत अवयवांची नावं असणारी चित्रं धुंडाळली. तरी समाधान झालं नाही म्हणून ‘एआय’ला विचारलं. तरी असमाधान आपलं कायमच! त्यासाठी घेतलेल्या शोधातूनच या लेखाचा जन्म झाला म्हणावं लागेल!
मराठीत ‘लवणे’ हे एक क्रियापद आहे. त्याचा अर्थ आहे वाकणे, झुकणे, ओणवे होणे, पडणे. हा ‘लवणे’ किंवा ‘लव’ हा शब्द संस्कृत ‘नम्’ शब्दापासून तयार झाला असल्याचं कृ. पां. कुलकर्णी म्हणतात. पालीमध्ये ‘नम’, कश्मिरीमध्ये ‘नमुन्’, बंगालीत ‘नमा’, ओडियामध्ये ‘नाइबा’, हिंदीत ‘नउना’, पंजाबीत ‘नेउना‘, सिंधीत ‘निवणु’ अशी त्याची विविध रूपं आहेत. ‘नम्’पासून तयार झालेल्या नमस्काराच्या कृतीतही हीच वाकण्याची कृती दिसते. ‘शिपाई साहेबापुढे लवतो’ म्हणजे नमतो असा अर्थ होतो. वि. का. राजवाड्यांनी ‘नामादिशब्दव्युत्पत्तिकोशा’त ‘थोरांपुढे लवावे म्हणजे नमावे’ असं एक उदाहरण दिलं आहे.
माणूस नमतो किंवा लवतो, तसा डोळासुद्धा लवतो. डोळ्यांच्या पापण्या खाली-वर होतात, झुकतात त्याला ‘डोळा लवणं’ म्हटलं जातं. उजवा-डावा कोणता डोळा लवतो यावरून शुभ-अशुभ संकेत मानण्याचीही आपल्याकडे परंपरा आहे. ‘लव लव करी पातं, डोळं नाही थाऱ्याला’ हे कवी आरती प्रभू यांची शब्दरचना असलेलं अन् पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं अप्रतिम गीत आहे. प्रेमात पडलेल्या एका स्वप्नाळू तरुणीची अस्थिर मनोवस्था या गाण्यातून व्यक्त झाली आहे. तिच्या मनाची चलबिचल अवस्था डोळ्यांतून व्यक्त होताना पापण्याही सारख्या लवलव करताहेत. प्रेमात पडलेल्या तरुणीची बावरलेली अवस्था ‘लव लव करी पातं’ या शब्दकळेतून कवीने अचूक वर्णन केली आहे.
थोडीशी झोप घेणे या अर्थाने ‘मी जरा लवंडते’ असं म्हटलं जातं. एखादी वस्तू न मोडता कशीही वाकवता येत असेल तर तिला ‘लवचीक’ म्हटलं जातं. इथं लवंडणे, लवचीक हे शब्द पडणे, झुकणे या अर्थाचेच भाव व्यक्त करताना दिसतात. या अर्थाची आणखीही उदाहरणं सांगता येतील – ‘भिंतीवरून लवला’ म्हणजे भिंतीवरून उडी मारली. ‘लवणा पडणं’ म्हणजे ओणवं होणं.
मराठीत ‘लवण’ असाही शब्द आहे. या ‘लवण’चा अर्थ आहे – खोलगट, खळगा, आत गेलेला, बाक आलेला भाग. उदा. पायाची, हाताची लवण किंवा लवणी. आपल्या शरीरातील गुडघा, कोपरा या अवयवांच्या सांध्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सांध्यांमुळे अवयव वाकवता, मुडपता येतात. त्यामुळे गुडघा किंवा कोपरा यांच्या मागील किंवा पुढील बाजूस खड्डा पडतो. त्यामुळे त्याला गुडघ्याची लवण, कोपराची लवण म्हटलं जातं. यावरून दोन्हीकडचे उतार जिथं एकत्र येतात आणि खोलगट भाग तयार होतो, त्यालाही लवण म्हणतात. तसंच रस्त्यात जिथं बाक, वळण, वक्रपणा असतो त्या भागालाही लवण म्हणतात. गावाकडे एखाद्या पायवाटेवर किंवा अगदी मुख्य रस्त्याला असं लवण असेल तर जवळच्या एखाद्या मळ्यावरून किंवा आणखी काही खुणेवरून त्याला नावंही दिलेली आढळतात.
संस्कृतमध्ये ‘लव’ हा आणखी एक शब्द आहे. अणू, अल्पांश, बिंदू, सूक्ष्म, अंश, किचिंत आणि केस, लोकर या अर्थाने हा शब्द वापरला जातो. मराठीतील ‘लवलेश’ या शब्दात अणू, अल्पांश, सूक्ष्म, किचिंत इ. हा पहिला अर्थ आढळून येतो. उदा. ‘त्याच्या स्वभावात ‘मी’पणाचा लवलेश नाही’. तसंच अंगावरचे बारीक केस या अर्थानेही मराठीत लव, लों, लाँव ही रूपं वापरली जातात.
संस्कृतमध्ये ‘लवण’ म्हणजे मीठ, खारट, क्षार असाही एक अर्थ आहे. यावरून समुद्राच्या पाण्याला ‘लवणजल’ म्हटलं जातं. यावरूनच खारवलेली फळे, भाज्या, लोणचं यांना उद्देशून ‘लवणशाक’ असा संस्कृत शब्द आहे. मीठ नसलेल्या पदार्थाला ‘अळणी’ पदार्थ म्हणतात. कमी मीठ असलेल्या पदार्थाला ‘मंदाळणी’ असा शब्द आहे. यातल्या ‘अळणी’ शब्दाचं ‘लवण’शी साधर्म्य याहे. एखाद्याची दृष्ट काढताना कडू निंबाची पानं, मीठ, मोहरी इ. पदार्थ वापरले जातात, त्याला ‘लिंबलोण’ असा शब्द आहे. यातील ‘लोण’ शब्दही ‘लवण’चंच बदललेलं रूप आहे. लव, लवणे, लवण, लवणी ही शब्दांच्या अर्थाची साखळी समृद्ध तर आहेच, पण हे जाणून घेण्यात एक मौजही आहे.