मदतनिधीचे लाभार्थी नाट्य रंगले, निर्माता संघानंतर आता नाट्यपरिषदेत नाराजी

308

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या मदतनिधी वाटपातील मतभेदामुळे गुरुवारी निर्माता संघाच्या अध्यक्षांसह पाच सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे वादाचे नाट्य रंगलेले असतानाच आज नाट्यपरिषदेच्या मदतनिधी वाटपात डावलल्याचा आरोप नियामक मंडळाच्या १५ सदस्यांनी केला आहे. या सदस्यांनी नाट्यपरिषदेच्या विश्वस्तांना ईमेल पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर गरजू कलावंतांसाठी नाट्यपरिषदेने ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच सर्वांना मदतीचं आवाहन करून एक कोटी २० लाख रुपये जमवले. या मदतीचं वाटपही केलं. घटक संस्थांच्या माध्यमातून मदतीचं वाटप करण्यात आल्याचा दावा नाट्यपरिषदेने केला. मात्र राज्यभरातील अनेक गरजू कलावंताकडे ही मदत पोचली नसल्याने नियामक मंडळाच्या १५ सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मदत वाटप करताना डावलण्यात आले, असा आरोप केलाय. मदत दिली ती मंडळी कोण, कुणाला पैसे दिले याची कोणताही कल्पना नियामक मंडळाच्या सदस्यांना देण्यात आली नाही. निर्णय घेतल्यानंतर माहिती म्हणून याचे मेसेज कुणाला केले गेले नाहीत, असे या सदस्यांचे म्हणणे आहे. यामध्ये सुशांत शेलार, वीणा लोकूर, योगेश सोमण, सविता मालपेकर, भाऊसाहेब भोईर, मुकुंद पटवर्धन, सुनील महाजन, दिलीप कोरके यांचा समावेश आहे.

दोन हजारांपेक्षा कमी मानधन आहे आणि ज्या कलाकारांचे नाटक फेब्रुवारीत सुरू होते. त्यांनाच मदत मिळणार असे निकष ठरवण्यात आले. नियामक मंडळांच्या बैठकीत जेव्हा मदतीबाबत ठरवण्यात आले तेव्हा काही सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत. मदत देताना महाराष्ट्रातील सगळ्यांचाच नीट विचार व्हावा. याबाबत आम्ही आग्रही होतो. अनेक ज्येष्ठ कलावंत मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. ते आमच्याकडे मदतीसाठी विचारणा करतात असे कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी केला.

घटनेनुसार गरजू निर्मात्यांना मदत; राहुल भंडारे यांचा दावा

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या मदतनिधी वाटपातील मतभिन्नतेमुळे अध्यक्षांसह पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी निर्माता संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. मात्र अडचणीत असलेल्या २८ सदस्य निर्मात्यांना घटनेनुसारच मदत करण्यात आल्याचा दावा प्रमुख कार्यवाह (काळजीवाहू) राहुल भंडारे यांनी केलाय.
राहुल भंडारे म्हणाले, मदतनिधी गरजू कलावंतांसाठी किंवा रंगमंच कामगारांसाठी राखीव नव्हता. ५० वर्षांत जमवलेला निधी आमच्या सदस्य निर्मात्यांसाठी आहे. जे वृद्ध, अपंग आहेत, त्यांच्या मदतीसाठी, मेडिक्लेमसाठी ठेवलेला आहे. त्याचे वाटप घटनेनुसार करण्यात आलंय. धर्मादाय आयुक्तांचे कार्यालय बंद असल्याने त्यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले होते. निर्माता संघाच्या बैठकीत गरजू सदस्यांना मदत करायची की नाही यावर ठराव घेतला. ६० पैकी ४४ जणांनी ठरावाला मंजुरी दिली. सहा जणांनी विरोध केला. बाकी तटस्थ राहिले. त्यामुळे बहुमताच्या आधारे घेतलेला हा निर्णय आहे, असे राहुल भंडारे यांनी सांगितले.

सर्व काही नियमांप्रमाणे व्हायला हवे- अजित भुरे
शारीरीकदृष्ट्या दुर्बल आणि वैद्यकीय मदतीकरीता निर्माता संघाच्या सदस्यांना मदत करणे अशी घटनेत तरतूद आहे, असे अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अजित भुरे यांनी सांगितले. निर्माता संघाचा निधी ज्या कारणासाठी आहे, त्या कारणासाठीच वापरला जावा. माझं म्हणणं आहे, जेव्हा आपण एफडी मोडतो तेव्हा नियमांप्रमाणे जायला हवे. चॅरिटी कमिशनरची परवानगी घेणे, कागदपत्रे तपासून घेणे, हे सगळं नियमाने व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे आणि ते मी मांडले होतं. प्रस्तावाला मी सुरुवातीला नकार दिला होता. निर्माता संघांच्या सदस्यांना पैसे मिळाले पाहिजे, यावर बहुमत झाले. उद्या कायदेशीर लढाई झाली तर माझ्याकडे अध्यक्ष म्हणून तेवढा वेळ नाही. त्यामुळे मी राजीनामा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या