रसिकहो – इशारा…व्यापक सर्जनशीलतेचा!

7824

>> क्षितिज झारापकर

व्हॉट्स इन अ नेम – नावात काय आहे? असं जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांनी म्हटलंय. खरं तर जग नावावरच चालतं. कोणतीही पाण्याची बाटली बिस्लेरी द्या म्हणूनच मागितली जाते. चॉकलेट मागताना कॅडबरीच मागितली जाते आणि टूथपेस्ट म्हणजेच कोलगेट असंच मानलं जातं. म्हणूनच नावाला खूप महत्त्व आहे. आपल्या देशात तर एखाद्याच्या नावावरून प्रांत, जातपात, धर्म सगळंच ठरवता येतं. नाटकंदेखील या नावाच्या वेढय़ातून सुटलेली नाहीत. वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमध्ये असणारी नाटकांची नावं वाचूनच बहुसंख्य पेक्षक कोणतं नाटक पाहावं हे ठरवतात ही वस्तुस्थिती आहे. व्यावसायिक नाटय़निर्माते तर नाटकाचं नाव हे चुरचुरीत आणि वेधक असावं याकडे अधिक लक्ष देतात. मराठी नाटकांना म्हणून तर लोकप्रिय मराठी, हिंदी गीतांच्या ओळी वापरण्याची सुरुवात झाली. कारण ती नावं आधीच पॉप्युलर असून चटकन लक्षात राहणारी ठरतात. पण बऱयाचदा त्या नावांचा नाटकाच्या आशय-विषयाशी संबंध नसतो आणि चटपटीत टायटल देण्याचं हे एक व्यापारी गमक आहे हे नाटक पाहिल्यानंतर लक्षात येतं. सध्या एक नवीन नाटक मराठी रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाचं नावही एका अत्यंत लोकप्रिय हिंदी गीतावर बेतलेलं आहे. ‘‘इशारों इशारों मे’’ हे ते नाटक. मात्र या नाटकाच्या बाबतीत हे शीर्षक अत्यंत नेमकं आणि योग्य ठरतं. त्याचं कारण इथेच उघड केलं तर मग हे नाटक पाहताना मला जो सुखद धक्का बसला तो तुम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणून हे नाव चपखल आहे यावरच आपण ते सोडू.

‘‘इशारो इशारों मे’’ हे मुळात एक गुजराती नाटक, जे मराठीत आलंय. कलेची ही देवाणघेवाण खूप छान सुरू आहे हे पाहून खरोखर बरं वाटतं. गुजरातीत प्रयाग दवे यांनी लिहिलेलं हे नाटक मराठीत स्वप्नील जाधव यांनी अनुवादित केलं आहे. कोणतीही लेखनवस्तू एका भाषेतून दुसऱया भाषेत येताना काही गोष्टी राहतात. याला लॉस्ट इन ट्रान्सलेशन म्हणतात. विनोदी लिखाणाच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवतं. ‘‘इशारो इशारों मे’’मध्ये असं अजिबात घडत नाही, हे स्वप्नील जाधवचं श्रेय आहे. यासाठी त्याला शाब्बासकी दिली पाहिजे. ‘‘इशारो इशारों मे’’ आपल्याला सुरुवातीपासूनच एका विलक्षण विनोदी वास्तवात नेतं. घटस्फोट घेण्याच्या कार्यप्रणालीत सरकारतर्फे एक सल्लागार – काऊन्सेलर नेमला जातो. ज्याच्या प्रयत्नांनंतर त्याने दिलेल्या रिपोर्टवर कोर्ट घटस्फोट द्यायचा की नाही हे ठरवतं. अशा एका सल्लागाराच्या ऑफिसमध्ये ‘‘इशारो इशारों मे’’ सुरू होतं. उत्तरोत्तर घडत जाणाऱया घटनांवरून जे लक्षात येतं ते खूपच विलक्षण आणि विनोदी आहे आणि हेच ‘‘इशारो इशारों मे’’ या नाटकाचं बलस्थान आहे. कोणताही प्रॉब्लेम नसताना एक दाम्पत्य घटस्फोटासाठी अर्ज करतं हे फारच विनोदी आहे आणि ते अर्ज का करतं हे अत्यंत विलक्षण. दोन्हीचा सुपर्ब संगम साधला गेल्याने ‘‘इशारो इशारों मे’’ हे एक लक्षणीय नाटक तयार होतं. दिग्दर्शक जय कपाडिया अट्टाहासाने विनोद न करता लेखकाच्या पात्र रचनेतले बारकावे वापरून हंशा गोळा करतात. हे हल्ली जरा कमीच पाहायला मिळतं. विनोदी अभिनेत्याच्या विनोद निर्मितीच्या क्षमतेवरच विनोदी नाटकं बेतलेली आढळतात. इथे एक समर्थ विनोदवीर नाटकात असताना असं होत नाही यासाठी जय कपडिया यांचं कौतुक करायलाच हवं.

सागर कारंडे हा सध्या हास्याचे कारंजे उडवणारा नट ‘‘इशारो इशारों मे’’मध्ये आहे. एरवी लोकप्रियतेच्या हवेवर उडणारा सागर येथे मात्र संपूर्णपणे वेगळय़ा बाजाचा अभिनय करतो ‘‘इशारो इशारों मे’’ आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलून नेतो. सागरच्या आजवरच्या कारकीर्दीत त्याने त्याचा असा एक विनोदी अभिनयाचा ठस निर्माण केलाय. पण इथे सागर तो ठसा खूप कमी वापरताना दिसतो. उलट तो नाटकातील प्रसंग, त्याच्या पात्राचं व्यक्तिमत्त्व आणि सहकलाकारांचा वापर करून रिऍक्शन मिळवताना दिसतो. हे खूप चांगलं आहे. आपल्याच ठशात न अडकता ‘‘इशारो इशारों मे’’मध्ये सागर कारंडे वेगळं काही करू पाहतो आणि त्यात तो यशस्वी होतो हे आनंददायक आहे. उमेश जगताप हा या नाटकातील दुसरा वल्ली कलाकार. अत्यंत उत्तम भूमिका उमेशच्या वाटय़ाला या नाटकात आली आहे. उमेशनेही सर्वोतो परीने त्याचं सोनं केलेलं आहे. स्वतःच्या संसारी प्रपंचात अडकलेला मॅरेज काऊन्सिलर उमेशने पोटतिडकीने उभा केलाय. सागरला साथ देत काही प्रसंगी स्वतः पुढाकार घेत उमेश जगताप ‘‘इशारो इशारों मे’’ अधिकाधिक खुलवत नेतो. शशिकांत गंगावणे यांचा समीर आणि प्रीत भारडिया या चिमुकल्याचा विघ्नेशदेखील सहज आणि प्रभावशाली झाली आहेत. ‘‘इशारो इशारों मे’’ या नाटकाचं सरप्राईझ एलिमेन्ट आहे ती नायिका संजना हिंदुपूर. संजनाचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक. ‘‘इशारो इशारों मे’’ या नाटकात संजना नाटकभर रंगमंचावर आहे, पण तिला एकही संवाद नाही. अशी भूमिका करणं भल्याभल्यांना कठीण जातं. सरगम ही मुलगी संजनाने अतिशय सहजपणे आणि प्रामाणिकपणे उभी केली आहे. सरगम मूकबधिर आहे आणि संजना हे पात्र अक्षरशः जगली आहे. शशिकांत गंगावणे यांचा समीर आणि प्रीत भारडिया या चिमुकल्याचा विघ्नेशदेखील सहज आणि प्रभावशाली झाली आहेत. राहुल रानडेचं संगीत, गुरू ठाकूरचं गीत, अजय आर्यनची प्रकाशयोजना, अजय पुजारेचं नेपथ्य, ईशा कपाडियाची वेशभूषा या सगळय़ा गोष्टी ‘‘इशारो इशारों मे’’ला प्रक्षणीय आणि श्रवणीय बनवतात. अजय कासुर्डे या निर्मात्याने हे एक खूप मस्त नाटक मराठीत आणलेलं आहे.

 • नाटक – इशारो इशारों में
 • सादरकर्ते – सई एंटरटेन्मेंट
 • निर्मिती – सरगम क्रिएशन
 • निर्माती – अजय कासुर्डे
 • सहनिर्माते – ईशा कापडिया, स्वप्नील माने, मंदार काणे
 • लेखक – प्रयाग दवे
 • अनुवाद – स्वप्नील वाघ
 • नेपथ्य – अजय पुजारे
 • संगीत – राहुल रानडे
 • गीते – गुरू ठाकूर
 • गायक – अवधुत गुप्ते, शाल्मली सुखटणकर
 • प्रकाश – अजय-आर्यन
 • रंगभूषा – राजेश परब
 • सूत्रधार – गोटय़ा सावंत
 • मूळ संकल्पना,
 • दिग्दर्शन – जय कपाडिया
 • कलाकार – संजना हिंदपूर, प्रीत भारडिया, शशिकांत गंगावणे, परमेश्वर क्षीरसागर, उमेश जगताप, सागर कारंडे
 • दर्जा – ***
आपली प्रतिक्रिया द्या