रसिकहो – चांगल्या नाटकवाल्याचं चांगलं नाटक!

6654

>> क्षितिज झारापकर

‘सर प्रेमाचं काय करायचं’ मकरंद देशपांडेचं अजून एक मराठी नाटक. हा कलाकार प्रायोगिक आणि व्यावसायिक या दोन्ही तथाकथित सीमारेषा सहज पुसून टाकून एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो.काही रंगकर्मींची प्रतिभा इतकी जबरदस्त असते की, त्यांच्या सगळ्या कलाकृतींमधून त्यांची प्रतिभा आपल्याला सतत दिसत असते. हे रंगकर्मी नाटय़क्षेत्राला सशक्त करतात. हे करत असताना ते त्यांच्या सभोवतालच्या मंडळींना घडवतदेखील असतात. मराठी नाटय़सृष्टीत अशा रंगकर्मींची अनेक उदाहरणे आहेत. आजही नाटय़सृष्टीत अशी नावे कार्यरत आहेत. एकाने नुकतेच एक मराठी नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणलेलं आहे. हे नाटक विशेष यासाठी आहे की, हा दुसरा भाग आहे. पहिला भाग ‘सर सर सरला’ हे नाटक प्रायोगिक स्थरावर काही वर्षांपूर्वी सादर केले गेले. ते नाटक शिवाजी, यशवंत, प्रबोधन, दीनानाथ, गडकरींसारख्या मेनस्ट्रीम नाटय़गृहांत सादर केले गेले नाही. मुळात त्या नाटकाची जुळवणी ही या भूतलावर पृथ्वी नामक जे बहुभाषिक नाटय़तीर्थक्षेत्र मानले जाते तिथे झाली होती. ते नाटक अमराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता काही वर्षांनंतर त्या नाटकाचा पुढचा भाग ‘सर प्रेमाचं काय करायचं’ हा मकरंद देशपांडे या नाटय़कर्मीने रंगमंचावर आणलेला आहे.

‘सर प्रेमाचं काय करायचं’ याला आपण जरी सिक्वेल मानलं तरी ते एक परिपूर्ण स्वतंत्र नाटक आहे. मकरंद देशपांडे यांचं हे नाटक महत्त्वाचं अशासाठी ठरतं की, हे नाटक आपल्याला नेमकं व्यावसायिक म्हणजे काय आणि प्रायोगिक म्हणजे काय, हा प्रश्न विचारायला लावतं. सध्या या वर्गीकरणाची व्याख्या कळेनाशी झालेली आहे. मराठी नाटक परिनिरीक्षण मंडळ व्यावसायिक आणि प्रायोगिक अशी वेगळी वर्गवारी करून प्रमाणपत्र देतं. पण कोणत्या वर्गात आपलं नाटक वर्गीकरण करून द्यायचं हे सर्वस्वी निर्माते आणि लेखकांच्या इच्छेवर अवलंबून असतं. त्याला कोणते नियम वा निकष ठरवलेले नाहीत. असं असताना ‘सर सर सरला’ या प्रायोगिक नाटकाचा पुढचा भाग ‘सर प्रेमाचं काय करायचं’ हा व्यावसायिक म्हणून सादर होतो आणि प्रश्न पडतो की, मग ही वर्गवारी नेमकी काय आहे आणि काय साधते?

मकरंद देशपांडे यांचा मिश्किलपणा वेगवेगळ्या व्यासपीठांवरून वेळोवेळी अनुभवलेला आहे. ते एक अत्यंत तीक्ष्ण विनोदबुद्धीचे रंगकर्मी आहेत. ही त्यांची विनोदबुद्धी ‘सर प्रेमाचं काय करायचं’ या नाटकाच्या सुरुवातीला तिसऱया मिनिटांला आपल्याला दिसते आणि मग नाटक संपेपर्यंत ती आपल्याला सोडत नाही. एका प्रायोगिक नाटकाच्या उत्तरार्ध असणाऱया नाटकाला प्रेक्षकांच्या इतक्या हंशा आणि टाळ्या मिळतात हे अद्भुत आहे. ‘सर प्रेमाचं काय करायचं’मध्ये हे घडतं. नाटकाचं लिखाण हे नेमकं आणि रंजक कसं असावं याचा जणू पाठच मकरंद देशपांडे ‘सर प्रेमाचं काय करायचं’च्या लिखाणातून आपल्याला देतात. सुरू झाल्या क्षणापासून कुठेही हे नाटक लय, पट्टी, विषय, जॉनर किंवा आपला प्रवास सोडत अथवा बदलत नाही. एकसंधपणे मार्गक्रमण करत प्रत्येक पात्राच्या माध्यमातून आणि वेगपणातून ‘सर प्रेमाचं काय करायचं’ आपल्याला खेळवत नेत जातं आणि आपण नाटकासोबत जातो. हे नाटककार मकरंद देशपांडे यांचं यश आहे. नाटकाचा एकूण इम्पॅक्ट मात्र केवळ लेखकाचा नसतो. त्यात इतर बरेच पैलू असतात. इथे मकरंद देशपांडेंचा दुसरा पैलू समोर येतो तो दिग्दर्शकाचा. ‘सर प्रेमाचं काय करायचं’ हे दिग्दर्शक मकरंद देशपाडे यांनी इतकं सहज आणि सरळ उभं केलंय की, गहन मतितार्थ असणारं हे नाटक पाहताना अगदीच सोपं वाटत राहतं आणि खूप बाबींवर आपल्याला प्रश्नही विचारायला लावतं. ‘सर प्रेमाचं काय करायचं’ या नाटकात पॉजेसचा सुरेख वापर दिग्दर्शकीय प्रगल्भता दाखवतो. नाटक मुळात तान विनोदी बाजाचं आहे. अशात पॉजेस वर्क करणं हे व्यावसायिक दृष्टय़ा अकल्पित आहे, पण इथे अत्यंत समर्पक पद्धतीने ते केलं गेलं आहे.

व्यावसायिक विनोदी नाटकं ही कलाकारांवर खूप अवलंबून असतात. ‘सर प्रेमाचं काय करायचं’ हेदेखील कलाकारांवर विसंबून आहे, पण ते कलाकारांच्या विनोदबुद्धीपेक्षा फक्त टायमिंग सेन्स आणि अभिनय क्षमतेवर अवलंबून आहे. नाटकातील विनोद हा कथानक, घटना आणि पात्ररचना यावर यथार्थपणे विसावलेला आहे. हंशा मिळवण्याचं टेन्शन त्यांच्यावर नसल्याने ‘सर प्रेमाचं काय करायचं’मधले सर्व कलाकार केवळ आपलं पात्र संपूर्ण क्षमतेनीशी प्रामाणिकपणे उभं करताना दिसतात. यात मकरंद देशपांडेंचा तिसरा अभिनयाचा पैलूसुद्धा येतो. स्वतः देशपांडे यात सरांचं पात्र करतात, पण कुठेही अट्टाहास न करता ते सर रंगवतात. हीच गोष्ट इतर कलाकारांचीही आहे. अजय कांबळे आणि आकांक्षा गाडे या दोघांनी आपापल्या पात्रातील उत्कंटता दर्शवत कमाल कामगिरी केली आहे. दोघेही अत्यंत फ्रेश आणि खूपचं परिणामकारक वाटतात. निनाद लिमये नाटकाच्या दुसऱया अंकात येतो आणि आपलं पात्र अतिशय योग्य उभं करतो. त्याचं पात्र तसं सोपं नाही. सरलाच्या नवऱयाचं एक वेगळंच तत्त्वज्ञान आहे जे निनाद बोलून न सांगता आंगिक अभिनयातून दाखवतो. या नाटकात कॅरिकेचर नाही असंही नाही. माधुरी गवळी या गणिताच्या अध्यापिकेचं अर्कचित्र सुंदर साकारतात. अमोघ फडकेंची प्रकाशयोजना ही नेहमीपेक्षा निश्चित वेगळी आहे. टेडी मौर्य यांनी इथे व्यावसायिकता लक्षात घेत नेपथ्य उत्तम दिलंय. मोठय़ा लाईटस्चा वापर असूनही रंगमंचावर खरा आरसा प्रेक्षकभिमुख ठेवणं लक्षणीय आहे. इथे ‘सर सर सरला’ सारखा भला मोठा लोलकवजा खंजीर मात्र नाहीये.

हे नाटक सिद्ध करतं की, व्यावसायिक आणि प्रायोगिक असं काही वर्गीकरण नाटकांमध्ये नाही. चांगलं नाटक आणि वाईट नाटक एवढंच वर्गीकरण असावं. मकरंद देशपांडे हा खरा नाटकवाला आहे आणि ‘सर प्रेमाचं काय करायचं’ हे चांगलं नाटक आहे.

 • नाटक – सर प्रेमाचं काय करायचं
 • निर्मिती – मकरंद देशपांडे नाटकवाला +VR
 • प्रकाश – अमोघ फडके
 • संगीत – शैलेंद्र बर्वे
 • नेपथ्य – टेडी मौर्य
 • निर्माता – राजीव देशपांडे
 • सहनिर्माता – श्रीकांत देशपांडे
 • सूत्रधार – गोटय़ा सावंत
 • लेखक/दिग्दर्शक – मकरंद देशपांडे
 • कलाकार – आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, अजय कांबळे, निनाद लिमये, अनिकेत भोईर, मकरंद देशपांडे
 • दर्जा ****
आपली प्रतिक्रिया द्या