70 वर्षांनंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन; सरहद संस्थेला आयोजनाचा मान

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. मुंबईत आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. तब्बत 70 वर्षांनंतर देशाच्या राजधानीला मायमराठीचा महाजागर होणार आहे. ‘सरहद’ या संस्थेकडून संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन फेब्रुवारी किंवा मार्च 2025 मध्ये होईल.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी मुंबई मराठी साहित्य संघात पार पडली. या बैठकीत संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात आले. महामंडळाच्या सर्व सदस्यांनी दिल्ली या स्थळाला एकमताने मान्यता दिली. 98 व्या संमेलनासाठी एपूण सात संस्थांची निमंत्रणे साहित्य महामंडळांकडे आली होती. त्यापैकी तीन जागांची महामंडळाने पाहणी केली. मसाप पुणे शाखेचे इचलकरंजी, नॅशनल लायब्ररी- मुंबई आणि सरहद संस्थेचे दिल्ली या तीन संस्थांच्या आमंत्रणाप्रमाणे त्या त्या जागांना महामंडळाने भेटी दिल्या. या तीन ठिकाणांपैकी संमेलनासाठी जागा, निवास व्यवस्था, संस्थेचे मनुष्यबळ, पुस्तक प्रदर्शनाची जागा इत्यादी मुद्दय़ांचा विचार करून दिल्ली येथील सरहद संस्थेची निवड करण्यात आली. स्थळ निवड समितीत महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, गुरय्या स्वामी, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रकाश पागे, प्रदीप दाते, सुनीताराजे पवार, डॉ. रामचंद्र काळुंखे यांचा सहभाग होता.

इच्छापूर्ती झाली!

साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे अशी मनापासून इच्छा होती. साहित्य महामंडळाने निमंत्रण मान्य केले याचा आनंद आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. दिल्लीतल्या मराठी माणसालाही साहित्य संमेलन इथे व्हावे असं वाटतं, दिल्ली आणि अवती भोवती असलेला मराठी माणूस संमेलनात एकत्र येईल. साहित्याचे आदानप्रदान होईल. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो, दिल्लीतही मराठी भाषेचा प्रभाव आहे. आता साहित्य संमेनल दिल्लीत होणार असल्याने आनंद झाला, असे ‘सरहद’चे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले.

 अभिजात मराठीसाठी रेटा

दिल्ली येथे संमेलन घेताना मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी रेटा वाढावा हा हेतू आहे, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले. मुंबईला मागचे संमेलन 1999 साली तर दिल्लीला 1954 साली झाले होते. म्हणजे सात दशके एवढा दीर्घकाळ दिल्लीत संमेलन झाले नव्हते. याचा विचारही आजच्या बैठकीत झाला. दुसरे म्हणजे बृहन्महाराष्ट्रात संमेलन झाले की त्याला वेगळे स्वरूप येते. महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना त्यांची मराठी भाषेची आवड जोपासण्यास  प्रोत्साहन देता येते.  या साऱयांचा विचार दिल्लीची निवड करताना झाल्याने उषा तांबे म्हणाल्या.

ऑक्टोबरमध्ये संमेलनाची रूपरेषा  

ऑक्टोबर महिन्यात मार्गदर्शन समितीची सभा होईल. त्यानंतर लगेच साहित्य महामंडळाची सभा होणार आहे.  त्यावेळी दिल्लीत होणाऱ्या संमेलनाचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. त्याचवेळी संमेलन अध्यक्षांची निवड होणार आहे.