
मराठवाडय़ाच्या सुमारे दोन कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी सरकारकडून हाती घेण्यात येत आहे. यासाठी सुमारे 1 हजार 330 किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून 11 धरणे लूप पद्धतीने जोडण्यात येणार आहेत.
कमी सरासरीने व असमान पडणारा पाऊस, भूजल पातळीत मोठय़ा प्रमाणात झालेली घट, भूजल व भुपृष्ठावरील पाण्याच्या साठय़ात होणारी घट, टँकरच्या संख्येत होणारी वाढ तसेच सन 2016 मध्ये लातूर शहरास रेल्वेद्वारे करण्यात आलेला पाणीपुरवठा ही परिस्थिती लक्षात घेता मराठवाडय़ात वॉटर ग्रीड निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 1 हजार 330 किलोमीटरची मुख्य पाइपलाइन टाकण्यात येईल. 11 धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिद्धेश्वर, येलदरी, इसापूर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पद्धतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाइपलाइन प्रस्तावित आहे.
इस्रायलच्या कंपनीसोबत करार
बीड जिह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी अनुषंगिक कामांसाठी 4 हजार 802 कोटींच्या पहिल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. या प्रकल्पासाठी इस्रायलच्या मे. मेकोरोट डेक्हलपमेंट ऍण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
























































