
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने राज्यभर पुकारलेल्या संपात आज कोल्हापुरातील
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर सहभागी झाले. त्यामुळे या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला.
सरकारकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनदेखील मागण्या पूर्ण होत नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे, तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज येथे निदर्शनेही करण्यात आली.
मोडकळीस आलेली वसतिगृहे दुरुस्त करावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात. सहयोगी व सहायक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरती करण्यात यावी. महागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
सोलापुरात दोनशेहून अधिक डॉक्टर संपात सहभागी
सोलापूर निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संपामध्ये सोलापुरातील दोनशेहून अधिक डॉक्टर संपात सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मिती करावी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय पालिका महाविद्यालयांत अपुरे व मोडकळीस आलेल्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी आदी मागण्यांसाठी राज्यभरात निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे. संपाबाबत राज्य सरकारने निर्णय नाही घेतला तर उद्यापासून अत्यावश्यक सेवा पण बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी डॉ. विकास कटरे, डॉ. दीपक काटे, डॉ. ओंकार शेंडे, डॉ. सागर राऊत यांच्यासह मोठय़ा संख्येने डॉक्टरांची उपस्थिती होती.




























































