आलिशान कारमधून गांजाची वाहतूक, वरवडे टोल नाक्यावर 36 लाखांचा ऐवज हस्तगत

आलिशान स्कोडा कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, 21 लाखांच्या गांजासह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ मोडनिंब महामार्ग सुरक्षा पथक व टेंभुर्णी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, कारचा चालक मात्र पळून गेला आहे.

पांढऱया रंगाच्या स्कोडा कारमधून वरवडे टोलनाक्यावर गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला. टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे पथकासह कारवाई करण्यासाठी रवाना झाले. त्यांनी मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पडवळ यांना सहकाऱयांसह वरवडे टोल नाक्यावर येण्यास सांगितले.

त्यामुळे पडवळ हे महामार्ग सुरक्षा पथकासह वरवडे टोल नाक्याच्या पुढे येऊन थांबले. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पांढऱया रंगाची स्कोडा कार येताना दिसली. मात्र, समोर पोलीस असल्याचे दिसताच कारचालकाने दरवाजा उघडून पळ काढला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, डिकीमध्ये गांजाचे दोन किलो वजनाचे 107 खाकी रंगाची चिकटपट्टी लावलेली पाकिटे आढळली.

कारमधील गांजाचे वजन 214 किलो 122 ग्रॅम भरले असून, त्याची किंमत 21 लाख 41 हजार 220 रुपये आहे. गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली अंदाजे 15 लाख रुपये किमतीची स्कोडा कार पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हवालदार शिवाजी भोसले यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या