मार्मिकचा बुधवारी 65 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

स्थळ: रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
वेळ: सायंकाळी 6 वाजता

महाराष्ट्रभूमीतच मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केले. ‘मार्मिक’मध्ये कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून बाळासाहेबांनी तत्कालीन सरकारला जेरीस आणले होते. बरोबरच मराठी माणसामधील आत्माभिमानही जागृत केला. त्या ‘मार्मिक’चा 65 वा वर्धापन दिन बुधवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जुलमी सत्ताधाऱ्यांवर धडाडणार आहे.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 6 वाजता ‘मार्मिक’चा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची उघड केलेली मतचोरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका यासह अनेक मुद्द्यांवर यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार आणि राजकारणाला कोणती दिशा देणार याकडे शिवसैनिकांसह महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते, उपनेते, पदाधिकारी आदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

लोककलेच्या तरुण सेवेकऱ्यांचे ‘फोक आख्यान’

लोककलेच्या तरुण सेवेकऱ्यांचा ‘द फोक आख्यान’ हा कार्यक्रम यावेळी होणार आहे. ‘द फोक आख्यान’ म्हणजे मराठी संस्कार, परंपरा, संस्कृती यांना चिरंजीवी ठेवण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या कलाकारांची चळवळ आहे. पाश्चात्यकला वेगाने हात-पाय पसरू लागल्याने लोककला पूर्णपणे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. असं होऊ नये म्हणून मराठी आख्यानकथा कलेचा मार्ग निवडून, गणापासून गोंधळापर्यंत नवीन रचना आणि चाली बांधून, मराठी लोककलेला तोच मान, सन्मान, लोकाश्रय मिळवून देण्यासाठी, तिच्या अस्सल मराठी संस्कारांची भुरळ पाडण्यासाठी, लोककलेचे सेवेकरी होऊन तरुण कलाकारांची ही चळवळ उभी राहिली आहे. ‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमाच्या थोडक्याच तिकीट शिल्लक असून त्या दादर येथील शिवसेना भवनाच्या पहिल्या मजल्यावर उपलब्ध आहेत, असे कळवण्यात आले आहे.