दिल्लीत पुन्हा मास्कची सक्ती, अन्यथा 500 रुपये दंड

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने राज्य सरकारने पुन्हा मास्कची सक्ती केली आहे. मास्क न घालणाऱयांना 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. खासगी वाहनांमधून प्रवास करणारे दंडास पात्र नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये बुधवारी कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. गेल्या 180 दिवसांमध्ये पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात मृत्यू झाले. त्याचप्रमाणे एकाच दिवसात 2146 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाणही वाढून 17.82 टक्के झाले आहे. त्यामुळे सरकारने मास्कसक्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

सुप्रीम कोर्टातही मास्क अनिवार्य

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी वकील, न्यायमुर्ती आणि कर्मचाऱयांना सुनावणीसाठी न्यायालयात येताना मास्क परिधान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कृपया मास्कचा वापर करा, असे आवाहन न्यायमूर्ती रमण्णा यांनी केले आहे.