Operation Sindoor या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते, मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 ठार

या हल्ल्यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जण आणि चार जवळच्या सहकाऱयांचा खात्मा झाला. खुद्द अझहरनेच ही बाब मान्य करत, या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते, असे तो म्हणाला. ‘जैश’चा मुख्य तळ असलेल्या बहावलपूर येथील हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ आणि दहशतवादी रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे, तर रौफचा मुलगा हुजैफा आणि त्याची पत्नी यात ठार झाले. बहावलपूर येथील जामिया मस्जिद सुभान अल्लाह येथे हा हल्ला केला गेला. अझहरची मोठी बहीण आणि तिचा नवराही यात ठार झाले. याशिवाय आणखी एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या हल्ल्यात एकूण 26 जण ठार, तर 46 जण जखमी झाल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले.

2001 मधील संसदेवर हल्ला, 2000 मधील जम्मू आणि कश्मीर विधानसभेवर हल्ला, 2016 मधील पठाणकोट येथील हिंदुस्थानी हवाई दलाच्या तळावर हल्ला आणि 2019 मधील पुलवामा बॉम्बस्पह्टात जैशचा सहभाग होता.

मसूदला 1999 मध्ये विमान हायजॅकमधील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात सोडून देण्यात आले होते. मे 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. एप्रिल 2019 पासून तो बहावलपूरमधील सुरक्षित ठिकाणी लपल्याची माहिती होती.