Jammu Kashmir – सोनमर्गमध्ये हिमस्खलन; पांढऱ्या वादळात घरं, हॉटेल, वाहनं बर्फाखाली गडप, काळजाचा ठोका चुकवणारा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सोनमर्गमध्ये मंगळवारी रात्री उशिरा निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. रात्री सव्वा दहाच्या सुमारास सोनमर्ग रिसॉर्ट परिसरात एक महाकाय हिमस्खलन झाले. सुदैवाने, या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या बर्फाच्या पांढऱ्या वादळाचा घरं, हॉटेल, वाहनं गडप झाली. याचा अंगावर काटा येणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग रिसॉर्ट परिसरात हिमस्खलन झाले. हिमस्खलनाचा हा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यात बर्फाचा महाकाय लोंढा घरांच्या दिशेने वेगाने येताना आणि काही क्षणांतच सर्वकाही पांढऱ्या शुभ्र बर्फाखाली गडप झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हिमस्खलनाची माहिती कळताच बचाव पथकाने तातडीने परिस्थितीची पाहणी केली असून पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपापुढे जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. सध्या परिसरात बर्फ हटवण्याचे काम आणि सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.