महाकुंभमेळ्यात दीड कोटी भाविकांचे अमृतस्नान, महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराजमध्ये लोटला जनसागर

महाकुंभमेळ्यात आज 45 व्या आणि शेवटच्या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त प्रयागराजमध्ये भाविकांची तोबा गर्दी उसळली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 1 कोटी 51 लाख भाविकांनी श्रद्धेची डुबकी मारली आणि अमृतस्नान केले. दरम्यान, 13 जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 66 कोटी भाविकांनी पवित्र स्नान करून नवा विक्रम प्रस्थापित केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 27 फेब्रुवारी रोजी स्वतः महाकुंभच्या ठिकाणी जाऊन औपचारिकरीत्या महाकुंभपर्व संपल्याची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर सफाई कर्मचारी आणि कुंभमेळ्यात स्वच्छता राखण्याशी निगडित लोकांचा सन्मानही करणार आहेत. महाकुंभपर्वाचा अंतिम दिवस असल्याने आणि त्यात महाशिवरात्री आल्याने महाकुंभात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रयागराजमध्ये चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुन्हा चेंगराचेंगरीची घटना घडू नये यासाठी प्रयागराज जंक्शनमधून संगम तटाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते.

हवाई दलाच्या कसरती

महापुंभपर्वाच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून हवाई दलाच्या वतीने विविध प्रकारच्या चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या. महाकुंभसाठी आलेल्या भाविकांसाठी ही सर्वात मोठी पर्वणी ठरली. यावेळी भाविकांवर हेलिकाॅप्टरच्या माध्यमातून पुष्पवर्षावही करण्यात आला.

वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात गर्दी

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर परिसरातही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागा साधूंनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.

194 रेल्वेगाड्या सोडल्या

दुपारी 12 वाजेपर्यंत भाविकांसाठी तब्बल 194 रेल्वेगाडय़ा चालवण्यात आल्या. या रेल्वेगाडय़ांमधून 9.81 लाखांहून अधिक भाविकांनी प्रवास केला. 25 फेब्रुवारी रोजी 314 गाडय़ा चालवण्यात आल्या. यातून साडेतेरा लाखांहून अधिक भाविकांनी प्रवास केला.

आतापर्यंतचे पवित्रस्नानाचे आकडे

  • 13 जानेवारी पौष पौर्णिमा 1.70 कोटी
  • 14 जानेवारी मकरसंक्रांती 3.50 कोटी
  • 29 जानेवारी मौनी अमावास्या 7.64 कोटी
  • 3 फेब्रुवारी वसंत पंचमी 2.57 कोटी
  • 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा 2 कोटी
  • 26 फेब्रुवारी महाशिवरात्री 1.51 कोटी