चार दिवसांत सोने 50 हजारांनी, तर चांदी 1 लाख 70 हजारांनी घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही आठवडय़ांपासून सातत्याने वाढणाऱया सोने आणि चांदीला ब्रेक लागला आहे. चार दिवसांतच सोने 50 हजारांनी तर चांदी 1 लाख 70 हजारांनी घसरली.  सोन्या-चांदीच्या ‘ईटीएफ’लाही मोठा फटका बसला आहे.

सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावरील एप्रिल एक्सपायरीचे सोन्याचे वायदे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास 3 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 43 हजार 335 रुपयांवर आले. गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 1 लाख 93 हजार 096 रुपयांच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर ही 26 टक्के म्हणजे सुमारे 50 हजार रुपये घसरण झाली. दरम्यान, जून आणि फेब्रुवारी एक्सपायरीचे सोन्याचे वायदे अनुक्रमे 4 टक्क्यांहून अधिक आणि सुमारे 3 टक्क्यांनी घसरले. मार्च एक्सपायरीचे चांदीचे वायदे 6 टक्क्यांनी घसरून 2,49,713 रुपये प्रतिकिलोग्राम झाले आहेत. गुरुवारी 4,20,048 रुपये प्रतिकिलोग्रामच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर ही सुमारे 41 टक्के म्हणजे 1,70,335 रुपये  इतकी मोठी घसरण आहे. मे महिन्यात मुदत संपणारे करारही 6 टक्क्यांनी घसरून 2,65,502 रुपये प्रतिकिलोग्राम झाले आहेत.

ईटीएफलाही फटका 

 सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये  घसरण आजही सुरूच आहे. एडलवाईस सिल्व्हर ईटीएफ 20 टक्क्यांनी घसरून 210.61 रुपयांवर पोहोचला आहे. ऑक्सिस सिल्व्हर ईटीएफमध्येही 20 टक्के घट झाली, तर यूटीआय सिल्व्हर ईटीएफ, डीएसपी सिल्व्हर ईटीएफ, आदित्य बिर्ला सन लाईफ सिल्व्हर ईटीएफ, कोटक सिल्व्हर ईटीएफ आणि इतर काही ईटीएफ प्रत्येकी 20 टक्क्यांनी घसरले आहेत.