
तब्बल 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तीशाली भूकंपाने तुर्कस्तान, सीरियामध्ये भयंकर विध्वंस घडविला. दोन हजारांवर नागरिक मृत्युमूखी पडले असून, हजारोजण जखमी झाले आहेत. शेकडो इमारती जमिनदोस्त झाल्या. त्याखाली हजारो नागरिक अडकले. दरम्यान, पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास तुर्कस्तानला भूकंपाचा पहिला धक्का बसला. भूकंपाची तीक्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू गाझियान्टे शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर जमिनीपासून 14 किलोमीटर खोलवर होता. काही तासानंतर भूकंपाचा दुसरा धक्का बसला. भूकंपाची तीक्रता 7.3 रिश्टर स्केल होती. त्यानंतर पुन्हा तिसरा धक्का बसला. 24 तासाच तब्बल 39 अफ्टर शॉक्स बसल्यामुळे प्रचंड नुकसान झाले, अशी माहिती तुर्कस्तानचे राष्ट्रपती रजब तैयब इरदुगान यांनी दिली.
हिंदुस्थानसह जगभरातून मदत
भूकंपाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, हिंदुस्थानकडून बचाव कार्यासाठी तुर्कस्तानला एनडीआरएफचे दोन पथके पाठविण्यात आली आहेत. तसेच इतर मदतही पाठविण्यात येणार आहे.
युरोपियन युनियन आणि नाटो देशांकडून वैद्यकीय मदत, लोकांच्या निवाऱयासाठी टेंट पाठविले जात आहेत.
सर्वत्र आक्रोश; हॉस्पिटल्सही कोसळले
भूकंपामुळे तुर्कस्तानातील अनेक शहरांमधील इमारती जमिनदोस्त झाल्या. सीरियातही भयंकर स्थिती आहे. तुर्कस्तानात एक हजारावर आणि सीरियात 300वर नागरिक मृत्युमूखी पडल्याचा सरकारी अंदाज असला तरी मृतांची संख्या किमान 2000वर असल्याचे वृत्त आहे.
सर्वाधिक हानी तुर्कस्तानात झाली. हजारो इमारती कोसळल्या. अनेक हॉस्पिटलही जमिनदोस्त झाली. 5000वर नागरिक जखमी आहेत. हजारो नागरिक ढिगाऱयाखाली अडकले आहेत. पाऊस, बर्फवृष्टी सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

























































