
कांदरवाडी सूर्यानगर येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहाला आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्यार्थ्यांवरील संकट टळले असून आतील सर्व साहित्याची अक्षरशः राख झाली आहे. 200 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सूर्यानगर येथे ही आश्रमशाळा आहे. आज संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास वसतिगृहातून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. काही क्षणातच आग पसरली. आगीचे वृत्त समजताच डहाणू नगर परिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. केवळ दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. मात्र त्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, गाद्या व अन्य महत्त्वाच्या वस्तू जळाल्या आहेत.




























































