सिलेंडरचा स्फोट झाल्याने, दरभंगा येथे भीषण आग; तीन महिन्यांच्या बाळाचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात सुंदरपूर येथे रविवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसर हादरला. एका घरात स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरला अचानक आग लागली. त्यानंतर स्फोट होऊन, ही आग झपाट्याने पसरली. या आगीमध्ये तीन महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग सुंदरपूरमधील तेनू पेडजवळ लागली. बेचन दास यांच्या घरी स्वयंपाक करत असताना, अचानक सिलेंडरला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाला. यामुळे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण अपघातात सात जण गंभीररित्या भाजले असून, जखमींना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये गोविंद दास, मिसू कुमारी आणि तीन महिन्यांच्या बाळाचा समावेश असल्याचे वृत्त आहे. बेचन दास, त्यांचा दुसरा मुलगा गोविंद, शेजारी आदित्य आणि एक अग्निशमन अधिकारी हे देखील जखमी झाले असून, सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेनंतर माहिती मिळताक्षणी, अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. स्थानिक रहिवाशांनीही बचावकार्यात मदत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.