
नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसक झटापटीत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक तरुण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. ही निदर्शने प्रामुख्याने १८ ते ३० वयोगटातील तरुणांनी (Gen-Z) केली असून, यामागे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील संताप आणि सोशल मीडियावर घातलेली बंदी हे प्रमुख कारण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूमधील माइतीघर मंडलापासून सुरू झालेली ही निदर्शने शांततेत सुरू झाली होती. मात्र निदर्शकांनी संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली. यावेळी निदर्शनकर्त्यांनी पोलिसांवर झाडाच्या फांद्या, पाण्याच्या बाटल्या आणि दगडफेक केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रुधुराचा वापर आणि रबर बुलेट्सचा मारा केला. यामुळे अनेक जण जखमी झाले, तर काठमांडूमधील विविध रुग्णालयांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.
दरम्यान, नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारने याबाबत माहिती देताना संगितले होते की, या कंपन्यांनी नेपाळमध्ये नोंदणी न केल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या बंदीमुळे तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर भ्रष्टाचाराविरोधातील व्हिडीओ आणि माहिती व्हायरल होत असल्याने सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निदर्शनकर्त्यांनी केला आहे. “सोशल मीडिया बंद करू नका, भ्रष्टाचार बंद करा,” अशा घोषणा देत तरुणांनी राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन रस्त्यावर उतरले.
हिंसक निदर्शनांनंतर काठमांडू जिल्हा प्रशासनाने न्यू बानेश्वर, शितल निवास (राष्ट्रपती निवास), लैनचौर (उपराष्ट्रपती निवास), बालुवाटार (पंतप्रधान निवास) आणि सिंह दरबार परिसरात दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यासह, पोखरा, बुटवल आणि भैरहवा येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.