
आझाद मैदानात नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणारी आंदोलने व मोठय़ा मेळाव्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला असला तरी, यामुळे सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या आणि काम करण्याच्या अधिकारांवर याचा कोणताही परिणाम होऊ नये, असे मत व्यक्त करत मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत आंदोलनाला बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात काय?
आझाद मैदानासारख्या ठिकाणी आंदोलनांना परवानगी देणं योग्य नाही. कारण, हे ठिकाण केवळ एक मैदान नाही, तर संपूर्ण दक्षिण मुंबईच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक भागाचा केंद्रबिंदू आहे. आझाद मैदानाला लागूनच मुंबई महापालिका उभी आहे, ती देशातील सर्वात श्रीमंत महापालिका. समोरच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, जिथून दररोज लाखो प्रवासी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवास करतात. जवळच मुंबई हायकोर्ट आहे, काही अंतरावर मंत्रालय आहे, जिथून राज्यकारभार चालतो. याशिवाय आरबीआयचं मुख्यालय, मुंबई पोर्ट, मंत्र्यांची मलबार हिलवरील निवासस्थाने याच परिसरात आहेत. या सगळ्या दृष्टीकोनातून, सुरक्षेच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आझाद मैदान आंदोलनांसाठी योग्य ठिकाण नाही, असे मिलिंद देवरा यांनी पत्रात म्हटले आहे.
टीका होताच घुमजाव
आंदोलन करणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे. माझे पत्र हे आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हते, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी होते, असे घुमजाव देवरा यांनी त्यांच्या मागणीवर टीका होऊ लागताच ट्विट करत केले आहे.