
Syed Mushtaq Ali Trophy 2025 चा रणसंग्राम सुरू आहे. चौकार आणि षटकारांची खेळाडू आतषबाजी करत आहेत. धारधार गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहेत. एकीकडे चाहत्यांना रंगततार सामन्यांची मेजवानी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मॅच फिक्सिंगची घटना समोर आल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. या प्रकरणी आसाम क्रिकेट असोसिएशनने चार खेळाडूंना तात्काळ निलंबीत केले आहे. अमित सिन्हा, ईशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी अशी निलंबीत करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये या चार खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव सनातन दास यांनी चारही खेळाडूंना निलंबीत करण्यात आल्याची माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “वेगवेगळ्या स्तरांवर या चार खेळाडूंनी आसामचे प्रतिनिधीत्व केले आहे. या चार खेळाडूंवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये आसामसाठी खेळलेल्या काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा आरोप आहे. हे आरोप उघड होताच BCCI च्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने या प्रकरणी चौकशी केली. ACA ने फौजदारी कार्यवाही सुरू केली आहे.” अशी माहिती सनातन दास यांनी दिली. याप्रकरणी गुवाहाटी गुन्हे शाखेत या चार खेळाडूंवर FIR दाखल करण्यात आली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामच्या संघाचा खेळ निराशानजक राहिला आहे. एलीट ग्रुपमध्ये आसामचा समावेश करण्यात आला होता. आसामला 7 सामन्यांपैकी फक्त 3 सामन्यांमध्ये विजय होण्यात यश आले आणि संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे हिंदुस्थानचा स्टार खेळाडू रियान पराग सुद्धा याच संघाचा भाग आहे. मात्र, मॅच फिक्सिंग प्रकरणी कारवाई करण्यात आलेले खेळाडू आसामच्या संघाचा भाग नव्हते.





























































