
मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावला याचे गुरुवारी इंग्लंडहून हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण करण्यात आले असून त्याला दिल्लीत आणण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 2000 मधील हिंदुस्थान दौऱ्यावेळी मॅच फिक्सिंगचा त्याच्यावर आरोप आहे. दिल्लीमध्ये आता त्याची कसून चौकशी करण्यात येणार असून यामध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंच्या नावांचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप असणाऱ्या संजीव चावला याला इंग्लंडमधील न्यायालयाने 23 जानेवारीलाच हिंदुस्थानी तपास यंत्रणांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत चावला याचे प्रत्यार्पण करण्यात आले असून त्याला नवी दिल्लीत ठेवण्यात आले आहे. नवी दिल्लीत आल्यावर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येईल.
Sanjeev Chawla, who was allegedly involved in a match-fixing racket that was busted by the Delhi Police in the year 2000, has been extradited from London and has been brought to Delhi. pic.twitter.com/oKaxnHafpF
— ANI (@ANI) February 13, 2020
दरम्यान, हिंदुस्थानी तपास यंत्रणांचा एका प्रकरणाचा तपास करताना केलेल्या फोन टॅपिंगमधून संजीव चावला याचा मॅच फिक्सिंगमध्ये हात असल्याचे समोर आले होते. जानेवारी ते मार्च 2000 या काळात त्यांने मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न केल्याचे तपासात दिसून आले. फेब्रुवारी ते मार्च 2000 या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ हिंदुस्थानात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा तत्कालिन कर्णधार हन्सी क्रोनिए याच्याशी कट करून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप संजीव चावला याच्यावर आहे.
पहिलेच प्रकरण
हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये 1992 मध्ये प्रत्यार्पण करार करण्यात आला. या कराराअंतर्गत एखाद्या आरोपीला हिंदुस्थानात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी समीरभाई विणूभाई पटेल यांना 2016 मध्ये हिंदुस्थानात आणण्यात आले होते. परंतु त्यावेळी पटेल यांनी स्वतःहून 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात चौकशीसाठी हिंदुस्थानात येण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतरच त्यांना इंग्लंडने हिंदुस्थानात पाठविले होते.


























































