बोंबला..! सामना टाय झाला, पण पंच सुपर ओव्हरच विसरले; IND vs SL वन डे लढतीबाबत मोठा खुलासा

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात नुकतीच तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील पहिला सामना टाय झाल्याने अनिर्णित राहिला होता, तर पुढील दोन सामने जिंकत श्रीलंकेने हिंदुस्थानला पराभवाचा धक्का दिला. आता या अनिर्णित राहिलेल्या सामन्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दोन्ही उभय संघांमध्ये 2 ऑगस्ट रोजी झालेला पहिला वन डे सामना टाय झाला होता. सामना टाय झाल्यानंतरही सुपर ओव्हर घेण्यात आली नाही. त्यामुळे क्रीडा प्रेक्षकही चकित झाले होते. मात्र आता याबाबत खुलासा झाला असून पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. पंचांनीही हे मान्य केले आहे. याबाबत ‘ईसपीएन क्रिकइन्फो’ने वृत्त दिले आहे.

सामना टाय झाल्यानंतर मैदानावरील पंच जोएल विल्सन आमि रवींद्र विमलासिरी, तसेच मॅच रेफ्री रंजन मदुगले, टीव्ही पंच पॉल रायफल आणि चौथे पंच रुचिरा पल्लियागुरुये यांच्यात वन डे लढत टाय झाल्यास सुवर ओव्हर खेळवण्याच्या आयसीसीच्या नियमाबाबत संभ्रम होता. हिंदुस्थानच्या या दौऱ्यासाठी श्रीलंका बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये झालेल्या करारानुसार सुपर ओव्हरला परवानगी होती की नाही याबाबत पंचांमध्ये संभ्रम होता. हा नियम समजून घेण्यात चूक झाल्याने सुवर ओव्हर घेण्यात आली नाही हे पंचांनी मान्य केले आहे.

आयसीसीचे नियम काय आहे?

आयसीसीने गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये वन डे सामन्यांबाबत नवीन नियम लागू केले होते. त्यानुसार दोन्ही संघांचे डाव पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या समान असेल तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. जर सुपर ओव्हरही टाय झाली तर निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील. जय सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी घेण्यात येणारी सुपर ओव्हर काही कारणास्तव घेता आली नाही तरच सामना अनिर्णित ठरवला जाईल. या निर्णयाबाबत पंचांमध्येही संभ्रम होता आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनीही सुपर ओव्हरबाबत विचारणा केली नाही.

चांगल्या सुरुवातीनंतरही सामना टाय

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांमध्ये 8 बाद 230 धावा केल्या आणि हिंदुस्थानपुढे विजयासाठी 231 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने 75 धावांची सलामी दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर इतर फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे हिंदुस्थानचा डाव 47.5 षटकांमध्ये 230 धावांमध्ये आटोपला आणि सामना टाय झाला.