सनियंत्रण समितीविरुद्ध संताप, माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांचे आंदोलन चिघळले; सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गरम्य माथेरानमधील ७४ हातरिक्षाचालकांना तातडीने ई-रिक्षा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन आज दुसऱ्या दिवशी चिघळले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही सनियंत्रण समितीने त्याची अंमलबजावणी अद्यापि न केल्याने या समितीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. दरम्यान सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा श्रमिक रिक्षा संघटनेने दिला आहे.

माथेरानमधील हातरिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा कायमस्वरूपी बंद करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ६ ऑगस्ट रोजी दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतही दिली. पण अद्यापि सर्व हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन झालेले नाही. माथेरानमधील ई-रिक्षांचा वाद आता चांगलाच विकोपाला गेला असून श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी सोमवारपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

आजपासून पाणीही पिणार नाही

श्रीराम चौकात श्रमिक रिक्षा संघटनेचे २२ सदस्य उपोषणास बसले आहेत. त्यापैकी आशीष सावंत, केतन आमणे, रोशन माथेरानवाला, संतोष लखन, अली डोंगरे, उज्ज्वला राणे यांची प्रकृती आज खालावली. उपोषणस्थळी डॉक्टरांना पाचारण करावे लागले. काही उपोषणकर्त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. मात्र कोणत्याही परिस्थिती आम्ही माघार घेणार नाही. दोन दिवसांपासून आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आता उद्यापासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

किमान चर्चेसाठी पुढाकार घ्या

माथेरानचे अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन श्रमिक रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. आम्ही उन्हातान्हात उपोषणाला बसलो आहोत. किमान चर्चेसाठी तरी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्रमिक संघटनेने केली आहे.