मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। धाराशिव

मातंग समाजावरील अन्याय थांबविण्यासाठी स्पेशल अ‍ॅक्टची तरतूद करण्यात यावी, लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी करून मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून देशपांडे स्टँड, शिवाजी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हातात लाल झेंडा घेऊन सहभागी झाले होते.

मातंग समाजावरील वाढत्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शहरात मंगळवार, २१ ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार वर्षात मातंग समाजावरील अन्यायात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. त्यापूर्वी अकरापासून जिल्ह्याच्या विविध भागात मोर्चासाठी कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे चौकात येत होते. गटागटाने येणाऱ्या या कार्यकर्ते अण्णाभाऊ साठेंच्या नावाने घोषणाबाजी करीत होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. ‘जय लहुजी‘ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. अण्णाभाऊ साठे चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी पाण्याची तसेच नाश्त्याची सोय करण्यात आली होती.

शहरातून निघालेल्या या आक्रोश महामोर्चात सर्वच पक्षाचे नेतेमंडळी सहभागी झाली होते. यामध्ये कोणाचेही नेतृत्व नव्हते. सुमारे २०० स्वयंसेवकांनी मोर्चाचे नियोजन केले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर लहान मुलींनी निवेदनातील मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी हातात लाल झेंडा घेऊन मोठ्या संख्येने मोर्चेकरी दुपारी एकच्या सुमारास आण्णाभाऊ साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते.

या आहेत मागण्या…

दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

उरगीर तालुक्यातील रुद्रवाडी, वाकडी येथील प्रकरणी तसेच धुळे येथे विहिरीच्या पाण्यावरून मातंग समाजातील युवकांची धिंड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

अ‍ॅट्रॉसीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.

अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे.

धाराशिव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा.

मातंग समाजावरील अन्याय रोखण्यासाठी स्पेशल अ‍ॅक्टची तरतूद करण्यात यावी.

भिमा कोरेगावमधील हल्लेखोरावर कडक कार्यवाही करुन दंगलीतील एकमेव फिर्यादी व साक्षीदार पूजा सगट या विद्यार्थीनीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी.

जातीच्या प्रमाणपत्रासाठी ५० वर्षाची चाजक अट रद्द करावी.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

summary…matnag-community-akrosh-morcha