मुंबईतील विविध भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करून रहिवाशांना मुबलक पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलबोगद्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात अमर महल ते वडाळा आणि वडाळा ते परळपर्यंतच्या 9.7 किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. वडाळा ते परळ दरम्यान 5.25 किमी लांबीच्या दुसऱया टप्प्यातील जलबोगद्याचे काम आज पूर्ण झाले. या बोगद्याचे काम आतापर्यंत 74 टक्के पूर्ण झाले आहे. हा बोगदा एप्रिल 2026 साली पूर्ण झाल्यावर माटुंगा, कुर्ला, भायखळा, परळ या परिसरातील रहिवाशांना 2061 पर्यंत मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी जलबोगदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अमर महल ते वडाळा आणि वडाळा ते परळमधील जलबोगद्याच्या पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान ते प्रतीक्षानगर दरम्यानच्या 4.3 किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 8 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आले.
जलबोगद्याचे फायदे
पाणीपुरवठा अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी जलबोगद्यांचा वापर केला जातो. जलबोगद्यांतून पाणीपुरवठा केल्यामुळे पाणी गळती व पाणीचोरीला आळा बसतो. लोखंडी पाइपलाइनमुळे पाणीपुरवठा केल्यानंतर काही वर्षांनी हे पाइप गंजतात. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी ते बदलावे लागतात. पण सिमेंटचा वापर करून बांधण्यात आलेले जलबोगद्याचे आयुष्य लोखंडी पाइपलाइनच्या तुलनेत जास्त असते.
खोलीचे काम पूर्ण
या प्रकल्प अंतर्गत तीन कूपकांचे (शाफ्ट) बांधकाम अंतर्भूत आहे. हेडगेवार उद्यान येथील 109 मीटर, प्रतीक्षानगर येथील 103 मीटर आणि परळ येथील 101 मीटर खोलीच्या तीनही कूपकांचे काम पूर्ण झाले आहे.
जलबोगदा बांधणारे देशातील पहिले तर जगातले दुसरे शहर
पाणी गळती, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर, खडक कोसळणे असा खडतर आव्हानात्मक टप्पा पार करत दुसऱया टप्प्यातील जलबोगद्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर 100 किमी लांबीचा जलबोगदा असणारे जगातील दुसरे शहर मुंबई ठरले आहे. पाणीपुरवठय़ासाठी जलबोगदे बांधणारी महापालिका देशातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे.