मौजपूर- CAA समर्थक आणि विरोधकांमध्ये धुमश्चक्री; दगडफेक, गोळीबार, गाड्या पेटवल्या

630

दिल्ली येथील मौजपूर येथे नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे आणि या कायद्याचे समर्थक एकमेकांसमोर ठेपल्याने धुमश्चक्री माजली आहे. दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाली आणि गाड्याही पेटवण्यात आल्या. याच दरम्यान एका तरुणाने बंदुकीने गोळीबार केल्याची घटनाही घडली आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मौजपूर-गाझियाबाद रस्त्यावर हा तरुण हातात बंदूक घेऊन गोळीबार करताना दिसत आहे. त्यात त्याने आठ वेळा गोळीबार केल्याचं दिसत आहे. या तरुणाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्नही केला. पण त्याने न थांबता गोळीबार सुरूच ठेवला, असं या व्हिडीओत दिसत आहे.

सोमवारी सकाळी 11 पासून सुरू असलेली ही धुमश्चक्री दुपारपर्यंत सुरू होती. या धुमश्चक्रीत दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. संतापाच्या भरात अनेक गाड्याही जाळण्यात आल्या. पोलिसांनी प्रसंगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या घटनेने परिसरात तणाव पसरला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे. तसंच सुरक्षेच्या कारणासाठी कलम 144अन्वये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

रविवारीही या परिसरासहब जाफराबाद, दयालपूर येथे हिंसाचार उसळला होता. या तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात 10 पोलीस तर एक सामान्य नागरिक जखमी झाला आहे. तसंच चिथावणीखोर भाषण दिल्या प्रकरणी भाजप नेता कपिल मिश्रा यांच्या विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या