बोंबला! बुमराहनंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत, रुग्णालयात दाखल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियामागील शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव नाही. एकामागोमाग एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. मंगळवारी टीम इंडियाचा हुकुमी एक्का वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आणि तो चौथ्या कसोटीतून बाहेर झाला. तत्पूर्वी सिडनी कसोटीत खिंड लढवणारा हनुमा विहारी (Hanuma Vihari) हा देखील चौथ्या कसोटीतून बाहेर फेकला गेला.

मधल्या फळीमध्ये हनुमा विहारीला पर्याय म्हणून ज्या मयांक अग्रवालकडे (Mayank Agarwal) पाहिले जात होते आता त्यालाही दुखापत झाली आहे. मंगळवारी नेटमध्ये सराव करताना त्याच्या हाताला दुखापत झाली असून स्कॅन करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. आधीच दुखापतीमुळे संकटात सापडलेला हिंदुस्थानचा संघ मयांकची दुखापत गंभीर नसावी अशीच प्रार्थना करतोय.

सिडनी कसोटीमध्ये हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी जिगरबाज खेळी करून सामना वाचवला. मात्र या दरम्यान विहारीच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला, तर अश्विनच्या पाठीच्या दुखापतीनेही डोके वर काढले आहे. अशात मयांकलाही दुखापत झाल्याने आता टीम इंडियाकडे अधिक पर्याय उरलेले नाहीत.

सिराजवर धुरा

15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे. कारण बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये नवदीप सैनी, शार्दुक ठाकूर किंवा टी. नटराजन यांना घेऊनच टीम इंडियाला हा सामना खेळावा लागणार आहे.

मधल्या फळीतील पर्याय

मधल्या फळीतील फलंदाज के.एल, राहुल यापूर्वीत दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. आता हनुमा विहारीला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे जास्त पर्याय नाहीत. खराब फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांच्यावर टीम इंडियाची मदार असणार आहे. तसेच जाडेजाच्या जागी शार्दुल की कुलदीपला खेळवायचे यासाठीही डोकेफोड करावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या