मयांकचा द्विशतकी धमाका; हिंदुस्थानला 343 धावांची आघाडी

439
mayank-agarwal-indoor

सलामीवीर मयांक अगरवालने नोंदवलेली 243 धावांची धावांची धडाकेबाज द्विशतकी खेळी आणि त्याला अजिंक्य रहाणे (86), चेतेश्वर पुजारा (54 ) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 60 ) यांची लाभलेली साथ यामुळे टीम इंडियाला दुसऱया दिवसअखेर पहिल्या डावात 6 बाद 493 अशी मोठी मजल मारता आली. त्यामुळेच बांगलादेशविरुद्धच्या या पहिल्या कसोटीत 343 धावांची आघाडी घेऊन हिंदुस्थानी संघाने भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. या लढतीचे आणखी पूर्ण तीन दिवस बाकी असून लढत वाचवण्यासाठी पाहुण्या बांगलादेशला शर्थीची झुंज द्यावी लागणार आहे.

मयांकचे कसोटी कारकीर्दीतील 12व्या डावात दुसरे विक्रमीद्विशतक

इंदूरच्या होळकर मैदानावर दुसऱया दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली, पण त्यानंतर पुजारा 54 धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अगरवालने डाव सावरला. रहाणे 86 धावांवर बाद झाला, अग्रवालने मात्र दमदार द्विशतक ठोकले. मात्र द्विशतकानंतर तुफान फटकेबाजीच्या प्रयत्नात तो 243 धावांवर बाद झाला. त्याने 330 चेंडूंत विक्रमी 243 धावांची द्विशतकी खेळी साकारली. त्यात 28 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अगरवाल-रहाणे जोडीने चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी साकारताना बांगलादेशी गोलंदाजीची अक्षरशः कत्तलच केली.

जाडेजाचीही तुफान फटकेबाजी

मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. सध्या जाडेजा 60 तर उमेश यादव 25 धावांवर खेळत आहे. अष्टपैलू जाडेजाने 76 चेंडूंत नाबाद 60 धावांची खेळी केली आहे. त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांची नोंद केली आहे. बांगलादेशकडून अबू जायेदने 4 तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी 1-1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :- बांगलादेश :- पहिला डाव सर्वबाद 150

हिंदुस्थान :- पहिला डाव 6 बाद 493 (चेतेश्वर पुजारा 54, मयांक अगरवाल 243, अजिंक्य रहाणे 86, रवींद्र जाडेजा खेळत आहे 60, उमेश यादव खेळत आहे 25; इबादत होसेन 31-5-115-1, अबू जायेद 25-3-108-4).

 

आपली प्रतिक्रिया द्या