महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात; सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापौर कोरोनामुक्त झाल्या असल्या तरी नियमानुसार आणि खबरदारी म्हणून महापौर बंगल्यावर क्वॉरंटाइन राहणार आहेत.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेचा कोरोनाविरोधात जोरदार लढा सुरू आहे. या लढ्यात महापौर किशोरी पेडणेकर सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. मुंबईकरांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांना भेटी देणे, पालिका अधिकारी-प्रशासनाशी समन्वय साधणे अशी कामे त्या नियमितपणे करीत आहेत. मात्र, या कामात अनेक वेळा कोविडमध्ये काम करणार्‍यांशी संपर्क येत असल्याने कोरोनाचा धोका होता. 10 सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यावेळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांना पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोनावर उपचार सुरू असतानाही त्या रुग्णालयातून कामकाज करीत होत्या. महापौर पेडणेकर यांनी औषधोपचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर अवघ्या दहा दिवसातच कोरोनावर मात केली आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. आपला क्वॉरंटाइनचा काळ संपल्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत पुन्हा जोमाने सहभागी होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या