वॉररूम मुंबईकरांसाठीच आहे, त्यांचे फोन उचला! महापौरांनी दिली वॉररूममधील कर्मचाऱ्यांना तंबी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रुग्णांना वेळेत बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये 24 तास वॉररूम सुरू करण्यात आले आहेत. रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकाचा फोन आला तर त्याला योग्य ते मार्गदर्शन करा. ही सर्व यंत्रणा मुंबईकरांसाठीच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे फोन उचला, त्यांना माहिती द्या. माझ्याकडे वॉररूमसंदर्भात एकही तक्रार येता कामा नये, अशी तंबी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दहिसर वॉरुरूममधील कर्मचाऱयांना दिली. महापौरांनी आज दहिसर येथील वॉररूमला भेट देऊन रहिवाशांकडून येत असलेल्या तक्रारींची शहानिशा केली आणि कर्मचाऱयांची झाडाझडती घेतली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या रोज सरासरी 8 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पालिका, राज्य आणि खासगी रुग्णालयांवर ताण येत आहे. पहिल्या लाटेवेळीच पालिकेने प्रत्येक वॉर्डात 24 तासांसाठी वॉररूम सुरू केले. त्यासाठी प्रत्येक वॉर्डचे नंबरही जाहीर केले आहेत. त्यामुळे बेड आणि रुग्णवाहिकांसाठी रुग्ण किंवा नातेवाईक वॉररूमशी संपर्क साधतात. मात्र, रिंग वाजूनही कोणीही फोन उचलत नाहीत, अशी तक्रारी वाढल्या. दहिसरच्या आर-उत्तर विभागातील वॉररूममधून फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आल्या होत्या.

महापौरांनाही ठेवले वेटिंगला

महापौरांनी दहिसर वॉररूमला फोन केला. चौथ्यांदा फोन केल्यावर त्यांचा फोन उचलला गेला. त्यांनी कोरोनासाठी मदत हवी आहे, असे सांगत एका कोरोना रुग्णाचा नंबर दिला. मात्र, त्यानंतर वॉररूमकडून त्यांना काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे महापौरांनी आज थेट दहिसरमधील वॉररूमला भेट देऊन सर्व कर्मचाऱयांना चांगलेच फैलावर घेतले.

मी तक्रारींबाबत स्वतः खातरजमा करते आणि नंतर कारवाई करते. मी महापौर असल्याचे सांगूनही तुम्ही मला अशी वागणूक देत असाल तर सर्वसामान्यांना काय वागणूक देत असाल याची कल्पना येते. मुंबईकर खूप त्रस्त आहेत. त्यांना अधिक त्रास देऊ नका. नाही तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत महापौरांनी कर्मचाऱयांना सुनावले. यावेळी आमदार विलास पोतनीस, प्रकाश सुर्वे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेविका सुजाता पाटेकर, शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद, मेघा भोईर, सुजाता शिंगाडे उपस्थित होते.

दरम्यान, महापौरांनी दहिसर कोरोना सेंटरला भेट देऊन आढावा घेतला तसेच कांदिवलीत नगरसेविका माधुरी भोईर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचेही महापौरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या