कर्तव्य बजावताना तासगावच्या जवानाने आयुष्य संपविले, यमगरवाडीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय 23) या सैन्य दलातील जवानाने शुक्रवारी आत्महत्या केली होती. यमगरवाडी येथे त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जम्मू-कश्मीरमधील सांबा जिह्यात कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून जवान मयूर डोंबाळे याने शुक्रवारी आत्महत्या केली होती. दोन वर्षांपूर्वीच तो सैन्य दलात भरती झाला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जवान मयूरच्या आकस्मिक मृत्यूमुळे तासगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जवान मयूर याचे पार्थिव आज तासगाव तालुक्यातील यमगरवाडी या त्याच्या गावी आणण्यात आले. पार्थिव दारात येताच आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. यानंतर सजविलेल्या ट्रक्टरमधून अंत्ययात्रा काढून पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले.

आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी, सरपंच अशोक यमगर, उपसरपंच नारायण यमगर, तासगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. माळी, ग्रामसेवक दीपक जाधव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सुभेदार मेजर आनंदराव पाटील, ‘14 मराठा’चे नायब सुभेदार बाबासाहेब वावरे, अर्जुन यमगर, पोलीस पाटील संजय यमगर यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.