मातृभाषेतून ‘एमबीए’ होता येणार; हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसीचे शिक्षणही प्रादेशिक भाषांमधून  

इंजिनीयरप्रमाणेच आता लवकरच मराठीतून ‘एमबीए’ही होता येणार आहे. अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) अभ्यासक्रम यंदापासून मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होत आहेत. लवकरच व्यवस्थापन (मॅनेजमेंट) व फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंगसारख्या अतांत्रिक अभ्यासक्रमांचे शिक्षणही प्रादेशिक भाषांमध्ये घेता येणार आहे. त्यादिशेने केंद्र सरकारची तयारी सुरू असल्याची माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. 

2021-22 या शैक्षणिक वर्षात एआयसीटीईची मान्यता असलेल्या 13 महाविद्यालयांमध्ये इंजिनीयरिंगचे मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, तमीळ आणि तेलुगू भाषांमध्ये ते शिकवले जाणार आहेत.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण प्रादेशिक भाषांमधून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एआयसीटीई गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. एआयसीटीईची मान्यता असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करण्यात आल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

अभ्यासक्रमातील तांत्रिक भाषा कायम राहणार

प्रादेशिक भाषेत इंजिनीयरिंगचा अभ्यासक्रम तयार करताना त्यातील तांत्रिक शब्द मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमधील ‘रेझिस्टन्स’ हा शब्द प्रादेशिक भाषेत भाषांतरित न करता तो तसाच कायम ठेवण्यात आला आहे. कारण तांत्रिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द नाहीत असे सहस्त्रबुद्धे यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

इंजिनीयर होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यात रस आहे का यासंदर्भात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘मातृभाषेतून पदवीपूर्व अभियांत्रिकी शिक्षण’ हे सर्वेक्षण करण्यात आले होते. एआयसीटीईची मान्यता असलेल्या महाविद्यालयांमधील 83 हजार विद्यार्थ्यांची मते त्यात जाणून घेण्यात आली. त्यात 44 टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला मातृभाषेतून इंजिनीयर होण्यास आवडेल, असे सांगितले होते. त्यामध्ये तामीळ विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. प्रवेश परीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांना प्रवेश

भविष्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांबरोबरच अन्य अभ्यासक्रमही प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होतील. त्यात व्यवस्थापनासह फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंग, ट्रव्हल अॅन्ड टूरीझम, टेक्सटाईल्स मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ड्रेस डिझायनिंग अॅन्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, फूड सायन्स आदी अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. त्यासाठी एक पेंद्रीय समिती बनवण्यात आली असून त्यात उच्च शिक्षण सचिवांचा समावेश आहे. नॅशनल बोर्ड ऑफ ऑक्रिडेशनने (एनबीए) प्रमाणित केलेले अभ्यासक्रम चालवणाऱया महाविद्यालयांमध्येच प्रादेशिक भाषांतील अभ्यासक्रम चालवले जाणार असून त्यात प्रदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांना अन्य अभ्यासक्रमांप्रमाणेच प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या