
एमबीबीएसच्या ‘मॉपअप राउंड’चा प्रवेश निश्चित करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्याचा निर्णय शनिवारी तातडीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना मॉपअप राउंडमध्ये प्रवेशासाठी मुदतवाढ मिळवून देण्यासाठीचे निवेदन दिले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा सांगलीचे डॉ. संजय पाटील, संभाजी पोळ, योगेश पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंद पवार, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे बजरंग पाटील, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, रमेश पवार, आली नालबंद, अमोल कांबळे, रुपेश मोकाशी, प्रदीप कदम आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची अडचण लक्षात आल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून यासाठीची असणारी 21 तासांची मुदत रद्द करून दोन दिवसांची मुदत वाढवून दिली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.























































