प्लॅस्टिक पिशवी आढळलेल्या फेरीवाल्यांचे परवाने रद्द होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने आजपासून धडक कारवाई सुरू केली असून पहिल्याच दिवशी प्लॅस्टिक पिशव्या आढळलेल्या सहा फेरीवाल्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारवाईदरम्यान तब्बल 95 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला असून 22 किलो प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले आहे.

राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत जोरदार कारवाई सुरू आहे. प्लॅस्टिकविरोधात कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांकडून मात्र प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने 1 फेब्रुवारीपासून प्लॅस्टिक पिशवी आढळणाऱया फेरीवाल्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता. यानुसार आज संपूर्ण मुंबईत धडक कारवाई सुरू करण्यात आल्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.

15 दिवसांत उत्तर द्या!

  • आजच्या कारवाईत प्लॅस्टिक आढळलेल्या सहा फेरीवाल्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यांना आपली बाजू मांडण्यास 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
  • मात्र पालिकेने याआधी अनेक वेळा आवाहन करूनही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्यामुळे या फेरीवाल्यांचा परवाना रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • दरम्यान, प्लॅस्टिकविरोधात पालिकेची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये सर्व 24 वॉर्डांमध्ये 107 इन्स्पेक्टर, 400 सीनियर इन्स्पेक्टर आणि 260 कामगारांच्या टीमच्या माध्यमातून ही कारवाई केली जाणार आहे.