
मुंबई क्रिकेट असोसिएशनने कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखान्यात नवीन खेळाडू नोंदणी केंद्राचे उद्घाटन केले आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील खेळाडूंची मोठी सोय होणार आहे.
एमसीए सचिव डॉ. उन्मेष खानविलकर यांच्या हस्ते, संयुक्त सचिव आणि अप्पर कौन्सिल सदस्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडले. पश्चिम उपनगरातील खेळाडूंना नोंदणीसाठी वांद्रे किंवा वानखेडे स्टेडियमपर्यंत लांबचा प्रवास करावा लागू नये, या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र दर बुधवार ते शुक्रवार, सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत सुरू राहील. खेळाडू आणि पालकांच्या मागणीची दखल घेत अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या केंद्राला तातडीने मंजुरी दिली, असे यावेळी एमसीए सदस्य भूषण पाटील यांनी सांगितले.
























































