निकाल लागून सहा महिने उलटले तरी अद्याप मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ शिक्षण विभागांतर्गच एम.कॉम. 2 या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळालेली नाही. विद्यापीठाने सत्र 3 व 4 चा निकाल विक्रमी वेळेत जाहीर केला. मात्र विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळाली नसल्याने तातडीने निकाल जाहीर करून काय उपयोग, असा सवाल युवासेनेने केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एम.कॉम. 2 च्या विद्यार्थ्यांनी रखडलेल्या गुणपत्रिकेविषयी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे ईमेल आणि दूरध्वनीद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी येथील युवासेना पदाधिकारी अथर्व राजन साळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसर संचालकांशी संपर्क साधला असता रखडलेल्या निकालाबाबत मुंबई विद्यापीठाशी केलेल्या पत्रव्यवहाराचा लेखाजोखाच त्यांनी मांडला.
अखेर मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुळकर्णी यांच्या पश्चात कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांना निवेदन देऊन तातडीने गुणपत्रिका देण्याची तसेच एमएमएस आणि इतर अभ्यासक्रमाबाबत असणाऱया अडचणींसंदर्भात संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली. लवकर ही बैठक आयोजित न केल्यास युवासेना आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.