एमडी बनवून विकणारे पाच ड्रग्जमाफिया गजाआड,51 कोटी 60 लाखांचे एमडी जप्त

1087

मेफेड्रॉन (एमडी) हे घातक ड्रग्ज तयार करून ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात विकणाऱ्या पाच ड्रग्जमाफियांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गजाआड केले. नवी मुंबई येथे एका फॅक्टरीत हे माफिया एमडी बनवायचे. त्याच फॅक्टरीवर धडक देत पोलिसांनी पनवेल येथील गोदामातून 51 कोटी 60 लाख किमतीचे 129 किलो एमडी साठा आणि एमडी विकून जमा झालेली 1 कोटी 40 लाखांची रोकड जप्त केली.

एमडीचा साठा पेडलरला विकण्यासाठी दोघेजण सोमवारी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी येथे येणार असल्याची खबर एटीएसला मिळाली. त्यानुसार एटीएसप्रमुख देवेन भारती, अधीक्षक विक्रम देशमाने, डॉ. विनयकुमार राठोड, एसीपी श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी युनिटचे पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव, अनिल ढोले, गिरीश बने व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून अब्दुल रझ्झाक कादश शेख आणि सुलेमान शेख हे दोघे नऊ किलो एमडीसह रंगेहाथ सापडले. हा एमडी साठा त्यांनी नवी मुंबईतून आणल्याची माहिती चौकशीत दिली. शिवाय वांद्रे येथे इरफान शेख हा सहकारी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इरफानला पकडून नवी मुंबईत धडक दिली. मग तेथील युनिटच्या मदतीने एमडी बनविणाऱ्या फॅक्टरीवर छापा मारला त्यावेळी तेथे तब्बल 120 किलो एमडी आणि हा गोरखधंदा करणाऱ्या टोळीतील नरेश मसकर आणि जीतेंद्र परमार हे दोघे हाती लागले. त्यानंतर पनवेल येथील त्यांच्या गोदामात छापेमारी करून 1 कोटी 40 लाखांची रोकड हस्तगत केली. नागरिकांपर्यंत जाण्याआधीच 129 किलो एमडी जप्त केल्याचे अधीक्षक देशमाने यांनी सांगितले.

मोठय़ा नेटवर्कला भगदाड

अटक आरोपी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाचे रसायन वापरून नवी मुंबईतील फॅक्टरीत एमडी बनवायचे. त्यानंतर तो एमडी मुंबई व राज्यातील विविध तस्करांना विकायचे. मुंबईतील तस्करांना एमडी पुरविणारे हे सर्वात मोठे नेटवर्क होते. पण एटीएसने या नेटवर्पलाच भगदाड पाडले. या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होईल असेही सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या