आपुलाची वाद आपणाशी

>> संध्या शहापुरे

आपण सर्वसामान्य माणसं जगण्याची एक चाकोरी स्वीकारतो. पण त्यातही एकमेकांबद्दल अपेक्षा असतात. मानापमान, हेवेदावे असतात. अगदी रक्ताच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. अशावेळी हे तंटे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपल्याशी म्हणजे आपल्याच मनाशी संवाद साधावा. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय ह्याचा शोध स्वतशीच घ्यावा.   आपल्या मनाला आपणच समजावून सांगायचे की , हे मना ! दुष्ट वासना- वाईट ईच्छा मनाला स्पर्शुही देऊ  नकोत. कुणाचे बरेवाईट व्हावे असा विचार ही मनात येऊ नये.  असे आपल्याच मनाला बजावयाचे . मनाला समजवायचे की पाप बुद्धीने तर कधीच वागू नकोसच पण  नीती धर्माचे आचरणही  तू सोडू नकोस !! धर्म ,न्याय ,सत्य ,प्रेम , त्याग यांची बांधिलकी मनातूनच मानली गेली पाहिजे. जीवनात जे खरोखर चांगलं श्रेष्ट आहे त्याचा विचार अंतर्यामी करणं आवश्यक आहे .

यासाठी आपल्याच मनाशी संवाद साधायचा मनातच वाद घालायचा आपल्या सारासार विवेकातून आपण त्याचे उत्तर शोधायचे. तुकाराम बुवा स्वानुभवाच्या बोलात म्हणतात… विरोधाचे मज न साहे वचन. कुणी विरोध केला की मन प्रक्षुब्ध होते. यावर तुकाराम महाराज उपायही सुचवतात… येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत । तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी।।