पुन्हा औषध बंदीचे संकट, पालिकेची रुग्णसेवा कोलमडणार

पालिका रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱया कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेतील 50 टक्के रक्कम दोन आठवडय़ांत देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असताना यातील 5 ते 10 टक्केच रक्कम आतापर्यंत जमा झाल्याने पुरवठादारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुरवठादार आज महत्त्वाची बैठक घेणार असून यामध्ये पालिका रुग्णालयांमध्ये होणारा औषध पुरवठा पुन्हा बंद करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

पालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांना सर्व सुविधा मोफत देण्याचे पालिकेचे धोरण आहे. केईएम, नायरसह 27 रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करण्यासाठी पालिकेने 150 कंत्राटदार नेमले. त्यांच्याकडून नियमित औषध पुरवठा केला जात असताना पालिकेने गेल्या सहा महिन्यांत 120 कोटींची देणी थकवली आहेत. त्यामुळे या कंत्राटदारांनी 13 जानेवारीपासून पुरवठा बंद केला होता, मात्र पालिकेने 50 टक्के रक्कम दोन आठवडय़ांत देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दोन आठवडे उलटूनही रक्कम मिळाली नसल्याचे असोसिएशनने सांगितले.

पालिका 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व थकबाकी देणार

औषध पुरवठादारांची संपूर्ण थकीत देणी 15 फेब्रुवारीपर्यंत देणार असल्याचे आश्वासन पुरठादारांना याआधीच देण्यात आले आहे. यानुसार थकीत देणी देण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी पुरवठादारांनी केलेल्या औषध पुरवठय़ाचा आढावा घेऊनच हे पैसे दिले जात आहेत. त्यामुळे पुरवठादारांनी सामंजस्याची भूमिका घेत औषधबंदीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

औषध पुरवठादार कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेतील 50 टक्के रक्कम दोन आठवडय़ांत देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप 5 ते 10 टक्केच रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे उद्या पुरवठादारांची बैठक घेऊन औषध पुरवठाबंदीबाबत निर्णय घेतला जाईल.
n अभय पांडय़ा, अध्यक्ष, ऑल इंडिया ड्रग्ज सप्लायर्स असोसिएशन