
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शनिवारी तीन मजली इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना आणि जनावरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहेत. तसेच खबरदारी म्हणून घटनास्थळाच्या आसपासची घरेही रिकामी करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृत व्यक्ती एकाच घरातील आहे. लोहिया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाकीर कॉलनीत ही घटना घडली. ही इमारत 35 वर्षे जुनी असल्याचे बोलले जात आहे. या इमारती लगतचा परिसर लहान असल्यामुळे बचावकार्यासाठी अनेक अडथळे येत आहेत. मात्र तरीही पोलीस आणि अग्निशमन दलासह एसडीआरएफचे पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.
मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीना यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील परिस्थितीवर भाष्य केलं. घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. प्रशासनाला इमारतीत उपस्थित असलेल्या 15 लोकांची यादी देण्यात आली होती. यामधील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 5 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. असे डीएम दीपक मीना यावेळी म्हणाले.