भीषण दुष्काळाने शेतकरी एकवटले, घोड व कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात पाणी परिषद

92

सामना प्रतिनिधी, श्रीगोंदा

”कुकडी व घोडच्या पाण्यासाठी प्रस्ताव तयार करा. ज्याप्रकारे डिंभे बोगदा मंजूर करण्यात आला तशाच प्रकारे पाण्याचे पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी न दिल्यास दिल्ली दरबारी जाऊन मंजूर करू. परंतु पाण्यासाठी राजकारण न करता राजकीय पुढाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी नीतिमत्ता सांभाळून नैतिकचे पालन केले पाहिजे”, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी श्रीगोंदे येथे केले.

घोड व कुकडी न्यायहक्काचे पाणी वाटपासाठी पाट पाणी कृती समितीने पाणी परिषद आयोजित केली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा हजारे व प्रमुख पाहुणे आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार होते. डिंभे बोगद्याचे काम झाल्यास सुमारे तीन ते साडे तीन टी एम सी पाणी वाढून एक अवर्तनाचे पाणी वाढून सर्वांना समान न्यायाचे पाणी मिळेल. या कामाला मंजुरी मिळाली आहे. तर पश्चिमेकडील समुद्राला जाणारे पाणी पूर्वेकडे वाढविल्यास पाण्याची अडचणी दूर होतील. घोड, कुकडीला पाण्याची कमतरता भासणार नाही.यासाठी राज्य सरकारने मान्यता न दिल्यास दिल्ली दरबारी दाद मागू. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य पध्दतीने जपून वापरले पाहिजे. हेच पाणी जपून वापरल्यास शेतकऱ्याच्या गाठीला दोन पैसे येतात .परंतु हे पाणी दुसऱ्या पाण्यात मिसळल्यास मग मात्र  बट्ट्याबोळ होतो. असे उदगार अण्णा हजारे यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे पोपटराव पवार म्हणाले की पाणी हे जागतिक संकट असून यापुढील युद्धे पाण्यासाठी होतील. पाण्यासाठी राजकारणाच्या, भाऊ बंदकीच्या,जातीच्या,बांधाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.त्याचप्रमाणे गावातील निवडणूकीमध्ये तरुणाई बिघडत चालली आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे  वाढदिवस, शाही लग्ने, खोट्या प्रतिष्ठेसाठी मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च केला जात आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. राज्यात सर्वप्रथम श्रीगोंदयाने पाणी प्रश्नासाठी पाणी परिषद घेतली. सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व श्रीगोंदे तालुक्याने ओळखले.आणि राज्यात पहिलीच पाणी परिषद घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे , यापुढेही जिल्हा व तालुक्यांनी एकत्र येऊन पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन केले पाहिजे  व वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात केली पाहिजे.

यावेळी श्रीगोंदयाचे आमदार राहुल जगताप म्हणाले की डिंभे बोगदा झाल्यास घोड धरणालाही पाणी पुरवठा होईल. पण  काही जण उगीच चुकीचा गैरसमज जनतेत पसरवीत आहेत , पण तालुक्यात मात्र जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नावर कोणीही राजकारण करू नका . घोड व कुकडीला कर्मचाऱ्यांची वानवा आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर व रोजंदारी वरील लोकांकडून काम केले जाते. नवीन भरती प्रक्रिया करून कर्मचाऱ्यांची भरती केली पाहिजे. यासाठी मी विधानसभेत आवाज उठवत आहे. यावेळी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र मस्के, ज्ञानदेव मोटे, एकनाथ आळेकर, बाबासाहेब भोस, प्रा. तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली,  यावेळी डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, बाळासाहेब महाडिक,प्रतिभा झिटे,केशवराव मगर, आदींसह घोड व कुकडीचे अधिकारी कर्मचारी,पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या