गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार 

गिरणी कामगारांचा त्याग लक्षात घेता घराच्या प्रश्नावर बंद गिरण्या किंवा अन्य पर्यायावर विचार व्हावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने बोलावण्यात आलेल्या कामगार आणि वारसांच्या बैठकीत अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी 1 मे पर्यंत हा प्रश्न सुटला नाही तर एल्गार आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर कामगार संघटना नेत्यांसह संबंधितांचीही तातडीने बैठक बोलावून गिरणी कामगारांना मुंबईतच घरे उपलब्ध करून देण्याबाबत एनटीसीसोबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले.