माहुलच्या प्रदुषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त बैठक घेणार – आदित्य ठाकरे

558
aaditya-thackeray-press-meet

विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अतिप्रदुषीत भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी पर्यावरण विभागाच्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, माहुल येथील वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादीत न राहता मुंबईतील इतर भागातही होत आहे. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे. त्यानुषंगाने माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पूर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच तेथील अतिप्रदुषीत आणि धोकादायक भागातील घरांचे पुनर्वसन जलद गतीने करण्याच्या अनुषंगाने म्हाडा, मुंबई महापालिका, उद्योग, पर्यावरण इत्यादी संबंधीत विभागांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल. या बैठकीचे आयोजन तातडीने करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

आदित्य ठाकरे म्हणाले, पर्यावरण रक्षणाचा कार्यक्रम हा फक्त शासकीय यंत्रणांपुरता मर्यादीत न राहता ती लोकचळवळ होणे गरजेचे आहे. यासाठी या मोहीमेत जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्याबरोबरच स्वयंसेवी संस्था, तरुण, विद्यार्थी यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात यावा, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण विभागाच्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या