मराठी चित्रपट महामंडळात बंड, अध्यक्षपदावरून मेघराज राजेभोसले यांना हटविले

मराठी चित्रपट व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील धुमसत असलेल्या राजकारणाचा आज स्पह्ट झाला. संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर ‘अविश्वास’ आणून त्यांना पदावरून हटविण्यात आले. त्यांच्यावर मनमानी व घटनाबाह्य कामकाजाचा आरोप करत संचालकांनी आठ विरुद्ध चार मतांनी ठराव मंजूर केला. उपाध्यक्ष धनाजी यमकर यांना प्रभारी अध्यक्ष नियुक्त केले.

धनादेश चोरी, सभासदांची साखर लाटण्यासह विविध कारणांनी मराठी चित्रपट महामंडळ गेल्या काही महिन्यांत चर्चेत आहे. त्यात या महामंडळाची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने आरोप-प्रत्यारोप वाढून सत्तारुढ गटातच अध्यक्ष राजेभोसले विरुद्ध उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव असे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दुसऱया नोटीसीनंतर आज संचालक मंडळाची दसरा चौक येथील शहाजी महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली.

बैठकीत दुसऱया क्रमांकावर अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या मनमानी कारभाराविरोधात चर्चा करून निर्णय घ्यायचा होता. काही वेळात मूळ विषय बाजूला सारून संचालक रणजित जाधव यांनी अध्यक्ष राजेभोसले यांच्या विरोधातच अविश्वास ठराव आणला.

महामंडळाच्या एपूण चौदा संचालकांपैकी साताऱयातील संचालक अण्णा देशपांडे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे उर्वरित 13पैकी उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, सतीश रणदिवे, सुशांत शेलार, पितांबर काळे, निकिता मोघे आणि विरोधी गटातील सतीश बीडकर अशा आठ जणांनी अध्यक्ष राजेभोसले यांच्या कामाला विरोध करत अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. राजेभोसले यांना संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण, विजय खोचीकर यांनी मतदान केले. आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. दरम्यान, मी राजीनामा दिलेला नसून उच्च न्यायालयात जाणार आहे. चार महिन्यांत सर्वांना जागा दाखवणार असल्याचा इशारा राजेभोसले यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या