बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये सराफा दुकानावर दरोडा पडला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि 13 लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी दुकानाचे मालक कैलास कमलनयन धानुका यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीचे सराफी लाईनमध्ये मथुरा ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात दोन पुरुष कामाला असून गुरुवारी रात्री आठ वाजत त्यांनी दुकान बंद केले. घरी जाताना काही दागिने त्यांनी सोबत घेतले तर काही दुकानात ठेवले. शुक्रवारी दुकान बंद होते. त्यानंतर शनिवारी सकाळी गोविंद अग्रवाल यांनी धानुका यांनी फोन करून दुकानाचे शटर उघडे असल्याचे सांगितले. त्यानंतर धानुका यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली असता दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले.
अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि मोरणी वजन 35 ग्रॅम किंमत 2 लाख 55 हजार 55 व चांदीची चेनपट्टी, तोरड्या, छंद, बिल्ले, बाळे, जोडवे, कडे, अंगठ्या, बिचवे, ब्रेसलेट, गळ्यातील चेन, देवाच्या मूर्ती, वाटी, चमचे, निरंजनी, करंडे असे 13 किलो वजनाचे 10 लाख 66 हजार रूपयांचे दागिने, सर्व मिळून 13 लाख 21 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, दुकानासमोरील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात चोर दुचाकीवरून येऊन शटर तोडत असल्याचे आणि चोरी करून फरार होत असल्याचे दिसले. याबाबत तक्रार दाखल होताच प्रभारी पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, वसंत पवार, पोलीस कर्मचारी प्रभाकर शिवणकर, विजय बेडवाल, इब्राहिम परसुवाले, समाधान अरमाळ, चालक संदीप भोंडाने तसेच फिंगर प्रिंट पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, शरद गिरी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कड करत आहेत.