शपथपत्रात खोटी माहिती देणे भोवले; नगराध्यक्ष कासम गवळी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा

1686

मेहकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी नगराध्यक्ष कासम गवळी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 करिता नगराध्यक्ष कासम पिरु गवळी यांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रा मध्ये अपूर्ण व चुकीची माहिती दिली असल्याचे निदर्शनास आल्याने नगराध्यक्ष कासम गवळी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कासम गवळी यांनी शपथपत्रामध्ये दिलेली माहिती व प्रत्यक्षात संबंधित यंत्रणांकडून अर्थात मुख्याधिकारी नगरपरिषद मेहकर, तहसीलदार मेहकर, दुय्यम निबंधक श्रेणी-1 मेहकर यांच्याकडून जी माहिती प्राप्त झाली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचे दिसून आले. अशा पद्धतीचा चौकशी अहवाल देखील प्राप्त झाल्याने नगराध्यक्ष कासम गवळी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 171 (जी) (निवडणूक संदर्भात खोटी माहिती देणे) कलम 177 कोणत्याही प्राधिकृत अधिकाऱ्यास खोटी माहिती देणे) व कलम 181(शपथेवर खोटी माहिती देणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी मेहकर यांना कळविले होते. मेहकर येथील अहमदशहा सबदरशाह यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) व उपविभागीय अधिकारी मेहकर यांना या प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशीत केले होते. त्यावरून संबंधित यंत्रणेने आपला अहवाल सादर केला होता. या संदर्भात करा.न.वि.शा./ डे-5/ C R- 125 /2019 जा क्र 885 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयातून एसडीओ मेहकर यांना आदेश प्राप्त झाल्याने त्यांनी नगराध्यक्ष कासम गवळी विरुद्ध मेहकर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली, त्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या