मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये १३,८५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला हीरा व्यापारी मेहुल चोक्सी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी केंद्र सरकारने बेल्जियम सरकारला अनेक आश्वासने दिली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने बेल्जियमच्या न्याय मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात चोकसीला हिंदुस्तानात आणल्यानंतर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील बॅरक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल, असे नमूद केले आहे. या तुरुंगातील सुविधा युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार असतील, असे हिंदुस्थानने आश्वस्त केले आहे.

मेहुल चोक्सी याला १२ एप्रिल २०२५ रोजी बेल्जियमच्या अँटवर्प शहरात हिंदुस्थानी तपास यंत्रणांच्या विनंतीवरून अटक करण्यात आली होती. चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. चोकसीवर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (कट रचणे), ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक), ४७७ए (खोटी कागदपत्रे) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

हिंदुस्थानने बेल्जियमला पाठवलेल्या पत्रात आर्थर रोड तुरुंगातील बॅरक क्रमांक १२ मध्ये चोकसीला स्वच्छ बिछाना, गादी, उशी, चादर आणि ब्लँकेट मिळेल, असे आश्वासन दिले आहे. वैद्यकीय कारणास्तव मेटल बेडही उपलब्ध करून दिला जाईल. तुरुंगात २४ तास वैद्यकीय सुविधा, २० खाटांचे रुग्णालय, आयसीयू आणि जे.जे. रुग्णालयात तातडीच्या उपचारांची व्यवस्था असेल. चोक्सीला त्याच्या वैद्यकीय अहवालांनुसार आवश्यक उपचार आणि औषधे मोफत मिळतील, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.