दुबई ATC ने एअर एअरलिफ्ट करण्यास दिला नकार, वेळेवर उपचार न मिळाल्याने ‘होर्मूज’च्या समुद्रात हिंदुस्थानी कॅप्टनचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मर्चेंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेले रांचीचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचा मध्य पूर्व आशियातील होर्मूज सामुद्रधुनी (Straits of Hormuz) येथे जहाज अवानावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी दुबई एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) त्यांना एअरलिफ्ट करण्यास नकार दिल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

राकेश रंजन सिंह हे अवाना शिपवर कॅप्टन म्हणून तैनात होते. २८ मार्च २०२६ पर्यंत लागू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे जहाज होर्मूजच्या समुद्रात अडकले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी दुबई एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे एअरलिफ्ट करण्याची मागणी केली होती, परंतु दुबई एटीसीने त्याला परवानगी नाकारली. उपचाराअभावी समुद्रातच त्यांची प्राणज्योत मालवली.

कॅप्टन राकेश रंजन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या रांचीतील निवासस्थानी शोककळा पसरली आहे. त्यांचे मोठे भाऊ उमेश कुमार यांनी सांगितले की, राकेश त्यांच्या मुलासारखे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

कॅप्टन सिंह यांनी मर्चेंट नेव्हीमध्ये २४ वर्षे सेवा दिली होती. आता त्यांचा पार्थिव देह रांचीला परत आणण्यासाठी त्यांचे कुटुंबीय केंद्र आणि राज्य सरकारकडे विनवणी करत आहेत. पत्नी आणि मुलांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी सरकारकडून लवकरात लवकर हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.