
थंडीचा कडाका वाढू लागला असून बदलापूर, कल्याण आणि कर्जतचे आज अक्षरशः महाबळेश्वरच झाले. या भागात किमान तापमान 10.4 तर कमाल तापमान साधारण 12.8 इतके होते. पुढील तीन दिवस थंडीचा हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या गुलाबी थंडीने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून नागरिक याचा आनंद घेत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने खाली येत आहे. काल गुरुवारी 11 डिसेंबर रोजी कल्याण-डोंबिवलीत 13 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर आज तापमानात आणखी घट होत कल्याणमध्ये चक्क 12.8 अंश सेल्सिअस इतके निच्चांकी तापमान नोंदले गेले. डोंबिवलीतही 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले. केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात थंडीचा प्रभाव वाढलेला दिसत आहे. बदलापुरात सर्वात कमी म्हणजे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कर्जतमध्ये 10.7 अंश तापमान होते.
उत्तर हिंदुस्थानातून येणारा थंड वारा आणि स्वच्छ आकाशामुळे किमान तापमानात घट होत असून पुढील काही दिवस ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे व रात्रीच्या वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





























































