मेट्रो मार्ग-7 वरील बाणडोंगरी स्थानकात सरकता जिना उभारला

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग-7 च्या बाणडोंगरी स्थानकावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पहिला सरकता जिना उभारला. 16.5 कि.मी. लांबीच्या या मेट्रो मार्ग-7 वरील 13 स्थानकांवर एकूण 82 सरकते जिने उभारण्यात येणार आहेत. अंधेरी पूर्व, जे.व्ही.एल.आर. जंक्शन, महानंद, आरे, पठाणवाडी, बाणडोंगरी, महिंद्र ॲण्ड महिंद्र, मागाठणे, देवीपाडा, नॅशनॅल पार्क आणि ओव्हरी पाडा या स्थानकांवर प्रत्येकी 6 तर शंकरवाडी आणि पुष्पा पार्क या स्थानकांवर प्रत्येकी 8 सरकते जिने सुमारे 48.30 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहेत.

त्याच प्रमाणे 18.5 कि.मी. लांबीच्या दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्ग-2 वरही 53 कोटी रुपये खर्चून 105 सरकते जिने उभारण्यात येणार आहेत. दहिसर, आनंद नगर, ऋषी संकुल, आय.सी.कॉलनी, एक्सर, डॉन बॉस्को, शिंपोली,महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड, कस्तूर पार्क, बांगुर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर या स्थानकांवर प्रत्येकी 6 तर डी.एन.नगर स्थानकावर 9 सरकते जिने उभारण्यात येणार आहेत.

हे सरकते जिने युरोपियन मानके आणि जागतिक दर्जाची सुरक्षा व्यवस्था ध्यानात ठेऊन बनविण्यात आले आहेत. वर आणि खाली जाऊ शकणारे हे जिने प्रत्येक तासाला 7,300 प्रवासी नेऊ शकतात तर दरवर्षी 437 कोटी प्रवासी नेऊ शकतात, असे प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या